मुख्य पोस्ट ऑफिसच्या प्रवेशद्वारातील वृक्षाला विजेच्या तारांच्या घर्षणाने आग

0
39

नगर – शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या प्रवेशद्वारातील एका वृक्षाला बुधवारी (दि. १३) दुपारी विजेच्या तारांचे घर्षण होऊन अचानक आग लागली. तथापि सदरची आग लगेचच विझल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मुख्य पोस्ट ऑफिस (प्रधान डाकघर)च्या प्रवेशद्वारात मोठमोठे वृक्ष आहेत. या वृक्षांच्या फांद्या पोलवरील विजेच्या तारांमध्ये घुसलेल्या आहेत. बुधवारी (दि. १३) वार्‍यामुळे या तारांचे एकमेकांना घर्षण झाले. या घर्षनाने वृक्षाला आग लागली. वृक्षाच्या फांद्या जळत गेल्या त्यामुळे कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच रस्त्याने येणारे-जाणारे आणि परिसरातील व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली. परंतु काही वेळातच तारांचे घर्षण बंद होऊन वृक्षाला लागलेली आगही विझली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. महावितरणने विजेच्या तारांमध्ये घुसलेल्या वृक्षांच्या फांद्यांची तात्काळ कत्तल करून भविष्यकाळातील असे धोके टाळावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.