कान का खाजतात?
सार्वजनिक ठिकाणी कानात बोट घालून कान गदागदा हलवणारे किंवा कानात काड्या घालून तल्लीन होऊन कान कोरणारे महाभाग तुम्ही पाहिले असतील. कान कोरडा पडला तर थोडीफार खाज येऊ शकते. ही खाज आपोआपच कमी होते; परंतु कानाच्या काही रोगांमध्ये मात्र खाज सारखीच येत राहते व उपचार केल्याशिवाय कमी होत नाही. पावसाळ्यात, दमट वातावरणात किंवा पोहणार्या व्यक्तींमध्ये कर्णपथात बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. अॅस्परजीलस, नायगर व कँडीडा अल्बीकन्स या बुरशींमुळे होणार्या संसर्गात कान खाजतात व बहिरेपणाही येतो. कानाची तपासणी केल्यास कर्णपथात काळपट वा विटकरी-काळपट रंगाची घाण जमा झालेली दिसते. ओल्या वर्तमानपत्राच्या बोळ्यासारखा रंग त्या घाणीला येतो. कानातील घाण वारंवार काढून टाकणे, पुसून घेणे, सॅलीसिलिक अॅसिड कर्णपथात लावणे, निस्टॅटीनसारखे बुरशीनाशक वापरणे अशा विविध उपायांनी हा रोग पूर्णपणे आटोयात येतो. कानावर अॅलर्जीमुळे किंवा जंतूसंसर्गामुळे फोड आले, तरीही कान सुरुवातीच्या काळात अथवा फोड फुटून खपली येण्याच्या काळात खाजतात. यावर अॅलर्जी व जंतुसंसर्गावरील उपचार करावे लागतात.