बिबट्याने पाडला गोठ्यातील शेळीचा फडशा

0
35

नागरिक भयभीत; बंदोबस्त करण्याची मागणी

नगर – पारनेर तालुयातील निघोज परिसरातील रसाळवाडी, मोरवाडी, शिववाडी परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली असून रविवारी मध्यरात्री दादाभाऊ चंद्रकांत रसाळ यांच्या घराजवळील जनावरांच्या गोठ्यात जाऊन बिबट्याने एका शेळीवर हल्ला करुन ठार मारल्याची घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने शेतकरी रात्री शेतीला पाणी भरण्यासाठी धजावत नाहीत, यासाठी दिवसभर शेतीसाठी विजेची मागणी सातत्याने होत आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.

या परिसरातील रसाळ यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळी ठार केल्याने लोक भयभीत झाले आहेत. सकाळी दादाभाऊ रसाळ यांनी पारनेरच्या वन अधिकार्‍यांशी संपर्क करुण माहिती दिली वन अधिकारी रेश्मा पाठक, कर्मचारी उमेश खराडे, विठ्ठल वाढवणे यांनी रसाळ यांच्या वस्तीवर येउन प्रत्यक्ष घटनास्थळी पंचनामा केला. साधारण ही शेळी अठरा हजार रुपये किमतीची असून वन अधिकार्‍यांनी तातडीने रसाळ यांना शासनामार्फत मदत करावी तसेच या ठिकाणी उस व इतर पिके मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.