नखे कापताना दुखत नाहीत, पण उपटल्यास दुखतात; असे का?

0
71

नखे कापताना दुखत नाहीत, पण उपटल्यास दुखतात; असे का?

दर आठवड्याला तुम्ही नेलकटरने नखे कापत असाल. चांगलीच सवय आहे ही. पण केव्हा तरी नख कापताना नख कापण्याऐवजी उपटले गेल्याने वा ओढले गेल्याने तुम्हाला नक्कीच दुखले असेल. अगदी ब्लेडने नख कापले तरी रक्त येत नाही वा दुखत नाही. मग उपटल्यावर वा ओढल्यावर ते का दुखते? याचे उत्तर कळण्यासाठी नखाची रचना समजून घ्यायला हवी! नखे, केस, घामाच्या ग्रंथी, तैलग्रंथी हे त्वचेचेच भाग आहेत. त्वचेतील पेशींपासून निर्माण होणार्‍या केरॅटीनच्या जाडसर थराने नख तयार होते. वरची बाजू सोडल्यास उर्वरीत तिन्ही बाजूंनी नखाभोवती त्वचेच्या घड्या असतात. केरॅटीनच्या थराला वेदनेची जाणीव नसते, कारण तो मृत भाग असतो. त्यात सजीव पेशी नसतात. नखात पोषणासाठी रक्तवाहिनी नसते किंवा संवेदना जाणवण्यासाठी मज्जातंतूही नसतात. त्यामुळे नख कापले तरी दुखत नाही. नखाच्या बोटाकडच्या भागाला नखाचे मूळ म्हणतात. येथूनच पेशींच्या थरापासून नखाची निर्मिती होत असते. या भागातील पेशी मात्र जिवंत असतात व त्यांना रक्तपुरवठा आणि मज्जातंतूंचाही पुरवठा असतो. नखाचा आपल्याला न दिसणारा आतला भाग त्याखालील नाजूक त्वचेत गुंतलेला असतो. साहजिकच नख उपटल्यास वा ओढले गेल्यास वेदनेची जाणीव होते. नखे कापताना मात्र आपण नखाचा निर्जीव भागच कापत असतो, त्यामुळे दुखत नाही.