नगरकरांच्या जीवनाशी निगडित प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष

0
21

अपघात करणारी स्कॉर्पिओ सीसीटीव्हीत दिसली तरी तपास लागेना : अभिषेक कळमकर 

नगर – निवडणुकीच्या तोंडावर नगर शहरात विकासकामांच्या निधीचा गवगवा सुरु आहे. परंतू या दरम्यान मूलभूत आणि नगरकरांच्या जीवनाशी निगडीत प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे पहायला मिळत आहे. एक सामान्य नागरिक म्हणून नगरकरांना चांगले रस्ते, सुरक्षितता मिळत नाहीय. शहरात मध्यंतरी शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे सांगण्यात आले. पोलिसांचा शहरावर चांगला वॉच असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनाही बरे वाटले. पण प्रत्यक्षात या यंत्रणेचा उपयोग किती होतोय हा संशोधनाचा विषय आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी प्रेमदान चौकात रात्री साडेदहा अकराच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीस्वारास उडवले. दुचाकीवर असलेले इंजिनिअर आकडे यांचा यात मृत्यु झाला. सीसीटिव्हीत स्कॉर्पिओ स्पष्ट दिसली. पण आज तीन दिवस लोटले तरी अपघात करणारी स्कॉर्पिओ आणि वाहनचालकाचा कुठलाही तपास पोलिसांना लावता आलेला नाही.

ही गोष्ट फक्त अपघात म्हणून सोडून द्यावी असे वाटत नाही. गाडी ताब्यात आली तर सदर घटना अपघात होती की घातपात ते समोर येवू शकते. पण आपले पोलिस त्यादृष्टीने हालचाल करीत नाहीत. यावरून संशयाचे वातावरण आणखी वाढू शकते. नगर शहरात वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. अनेक सिग्नल बंद असतात. वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा काम करीत नाही. अशावेळी अपघाताच्या नावाखाली हिट अ‍ॅण्ड रनचे प्रकारही घडू शकतात. फक्त निधी आणून कामे केल्याचा बोभाटा करण्याने काही होणार नाही. निधीचा योग्य विनियोग आणि नागरिकांना त्याचा फायदा होणे महत्वाचे आहे, असे एक जागरुक नगरकर म्हणून मला वाटतं, असे अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे.