मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
24

किरणोपचार म्हणजे काय?

अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणूबाँबसारख्या विध्वंसक अस्रामुळे होणार्‍या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणामच खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग, इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गापैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात. क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणार्‍या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी-अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचेच दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही, हे बघण्यासाठी होतो. गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या साहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यतः शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.