अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ मित्रानेच केला व्हायरल

0
37

अल्पवयीन आरोपीविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर – एका अल्पवयीन मुलीचा ‘स्नॅपचॅट’ वरील आक्षेपार्ह व्हिडीओ तिच्या अल्पवयीन मित्रानेच सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी बुधवारी (दि.६) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून घडलेला प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सांगितला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडित मुलीला येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या श्रीरामपूर शहरातीलच अल्पवयीन मुलाविरोधात भादंवि कलम ५०० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरात राहणारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी शिक्षण घेते.

तिची ओळख एका अल्पवयीन मुलासोबत झाली होती. ते दोघे मित्र असल्याने त्यांनी ‘स्नॅपचॅट’ या सोशल मीडियावरील अ‍ॅपिवर संयुक्त खाते उघडले होते. दरम्यान यावर फिर्यादी अल्पवयीन मुलीने तिचा खासगी व्हिडीओ गॅलरीमध्ये सेव्ह केला होता. ‘स्नॅपचॅट’च्या संयुक्त खात्याचा आयडी व पासवर्ड तिच्या मित्राकडे असल्याने त्याने तो आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसर्‍या व्यक्तींना पाठवून फिर्यादी अल्पवयीन मुलीसह तिच्या नातेवाईकांची बदनामी केली. सदरचा प्रकार ४ मार्चपूर्वी घडला असून फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांना सदरचा व्हिडीओ गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर फिर्यादी अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत.