रात्रीच्या वेळी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास

0
44

नगर – रात्रीच्या वेळी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत घरातील ६६ हजार ३०० रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील खंडाळा गावच्या शिवारात बुधवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. याबाबत सुनिता अशोक गिरवले यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे खंडाळा गावच्या शिवारात जांभूळ ओढा परिसरात असलेल्या लोटके वस्ती येथे घर आहे. त्या मंगळवारी (दि.५) सायंकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेलेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री ७.३० ते बुधवारी (दि.६) सकाळी ७ या कालावधीत त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात सर्वत्र उचकापाचक करून घरातील कपाटात तसेच त्यांच्या सासूबाई यांनी पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सुमारे ६६ हजार ३०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. बुधवारी सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वान पथकानेही चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. दुपारी सुनिता गिरवले यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.द. वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.