स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज : डॉक्टर रेणुका पाठक

0
34

नगर – स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. मुलगा-मुलगी समसमान मानण्याची गरज आहे. गर्भामध्ये केली जाणारी स्त्रीभ्रूणहत्या सामाजिक समतोल बिघडवणारी आहे. यामुळे मुलांच्या जन्मदरानुसार मुलींच्या जन्मदराचा गंभीर प्रश्न बनला असल्याचे प्रतिपादन स्त्री रोग तज्ञ डॉ. रेणुका पाठक यांनी केले. बुरुडगाव रोड, येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नेहरु युवा केंद्र, जय युवा अकॅडमी, मनपा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यशाळा पार पडली. यामध्ये विविध सामाजिक विषयावर युवक-युवतींमध्ये जागृती करण्यात आली. याप्रसंगी नेहरु युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात, डॉ. सरिता माने, सुहासराव सोनवणे, अ‍ॅड. अनिता दिघे, डॉ. अमोल बागुल, अनंत द्रविड, उपप्राचार्य जाधव सर, विद्या शिंदे, शाहीर कान्हू सुंबे, रजनीताई ताठे, अनिल साळवे, रोहिणी थोरात, कावेरी कैदके, चंद्रकांत ठोंबे, पोपट बनकर, आरती शिंदे, अश्विनी वाघ, तनीज शेख आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. पाठक म्हणाल्या की, चिमुकल्या मुलींना चूकीच्या रुढी-परंपरा, अंधश्रद्धेपासून लांब ठेवून व त्यांना सुशिक्षित करुन प्रगतशील करणे हा महत्त्वाचा उद्देश मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा आहे.

जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यशाळेत सामाजिक प्रश्नांवर जागृत

स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तुलसीच्या रोपाला पाणी अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. हार-तुरे व फेट्यांना फाटा देवून पाहुण्यांचे स्वागत भारताचे संविधान पुस्तक भेट देऊन करण्यात आले. या उपक्रमातंर्गत जिल्ह्यात युवक-युवतींमध्ये मतदार जागृती अभियान, नारीशक्ती, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, व्यसनमुक्ती, तृणधान्य, क्रीडा क्षेत्राचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले असल्याचे नेहरु युवा केंद्राच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. डॉ. सरिता माने यांनी महिलांनी आज प्रत्येक क्षेत्र काबीज करत आपला ठसा उठविला आहे. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भारतीय महिलेला आत्मव विकासाचा मार्ग दाखविला. कुटुंब, नोकरी, शिक्षण व समाज जडणघडणचे दायित्व भारतीय स्त्रीने स्वतःच्या खांद्यावर घेऊन समर्थपणे पेलविण्याची क्षमता निर्माण केली असल्याचे यांनी सांगितले.

अ‍ॅड. अनिता दिघे म्हणाल्या की, व्यसनामुळे वैयक्तिक जीवन नष्ट होते, पण कुटुंबावरही हानिकारक परिणाम होतात. दारू, गुटखा, मावा, तंबाखू, सिगरेट, गांजा अशा अमली पदार्थाच्या सेवनामुळे अमूल्य असे शरीरसंपदेला नुकसान पोहचत असते. शारीरिक सदृढता हीच खरी संपत्ती आहे. संगत चांगली असेल तर तो व्यक्ती व्यसनांकडे व्यक्ती वळत नाही. युवकांनी जीवनात आलेले अपयश व निराशेला सकारात्मकतेने घेत व्यसनापासून लांब राहण्याचे त्यांनी आवाहन केले. डॉ. अमोल बागुल यांनी आई-वडील, शिक्षक यांचा आदर राखला जाईल असे कार्य युवकांकडून अपेक्षित आहे. सदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेमध्ये युवकांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. निर्भयपणे कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचे सांगितले. तर उपस्थित युवक-युवतींना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमासाठी दिनेश शिंदे, सुभाष जेजुरकर, डॉ. संतोष गिर्‍हे, रवी सातपुते, रमेश गाडगे, प्रा. अशोक डोंगरे, सुवर्णा कैदके, जयेश शिंदे, कल्याणी गाडळकर, आनंद वाघ, सचिन साळवी, परवीन शेख, विनोद साळवे आदींनी परिश्रम घेतले.