१०८ रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या डॉक्टरांना मिळेनात विविध सुविधा

0
45

डॉक्टर संघटनेने आमदारांकडे मांडल्या व्यथा; न्याय मिळवून देण्याची केली मागणी 

नगर – गेल्या १० वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर १०८ रुग्णवाहिकेवर काम करणार्‍या डॉटरांना अपघात विमा योजना, रजेचा पगार व कोणत्याही प्रकारचा भत्ता मिळत नसून याबाबत शासनस्तरावर आमचे प्रश्न मांडून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी १०८ अ‍ॅम्ब्युलन्स डॉटर फोरम अहमदनगर जिल्हा या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आ.संग्राम जगताप व आ. निलेश लंके यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. दोन्ही आमदारांची समक्ष भेट घेवून दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, आम्ही सर्वजण गेल्या १० वर्षांपासून राज्यात इमरजन्सी मेडीकल सर्व्हिस बी.व्ही. जी. कंपनी मार्फत उत्तम पद्धतीने सेवा देत आहोत. परंतु अद्याप आम्हाला अत्यंत कमी पगारात काम करतांना देखील कुठल्याही प्रकारचा अपघात विमा योजना लागू करण्यात आलेला नाही. कोव्हीडच्या काळामध्ये सर्व जग स्थिर झालेले असताना आम्ही जीवावर उदार होऊन रुग्णांसाठी आमचे काम सदोदित चालू ठेवले. तरीदेखिल आम्हाला अद्यापपर्यंत विमा संरक्षण नाही.

आजारी रजेचा पगार मिळत नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जात नाही. १० वर्षे पूर्ण झाली असून पुढील वाटचालीसाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले दिसून येत नाही. महाराष्ट्र शासनाने आम्हाला एम.ई.एम.एस. हे प्रशिक्षण दिलेले आहे. तरी नवीन कॉन्टॅट लिस्टमध्ये आम्हाला रेग्युलर करुन घेण्याची तरतूद करण्यात यावी आणि वरच्या बाबींचा प्राधान्याने विचार करून आमच्या मागणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.