औषध विक्रेत्याकडून तक्रारी सांगून औषधे घ्यावीत का?
एकदा एक गंमतशीर घटना बघायला मि ळाली. औषधे घ्यायला एका दुकानात गेलो होतो. तेवढ्यात एक गृहस्थ दुकानात आले व तावातावाने दुकानदाराशी भांडू लागले. “मी तुम्हाला संडास थांबण्यासाठी औषध मागितले होते ना?” दुकानदार म्हणाला, “अहो, मला वाटलं संडास होण्यासाठी औषध पाहिजे आहे!” हा झाला एक साधा किस्सा. याहून गंभीर व प्राणघातक ठरलेल्या घटनाही सांगता येतील. औषध व विष यात फक्त देणार्याच्या उद्देशाचा फरक आहे, असे म्हटले जाते. यावरून चुकीमुळे घेतलेल्या औषधांच्या परिणामाची कल्पना यावी. एकाचे औषध हे दुसर्यांसाठी विष ठरू शकते. डोकेदुखीसाठी उपयुक्त असे अॅस्पीरिन जठराचा व्रण असलेल्या व्यक्तीसाठी हानिकारक ठरू शकते. सल्फरच्या गोळ्यांनी एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगावर पुरळ येऊ शकते. काही औषधांमुळे अॅलर्जी होऊ शकते. औषध विक्रेते फार्मसी अर्थात औषध निर्मिती शास्त्रातील पदविका वा पदवीधारक असायला हव्यात; पण बर्याचदा औषधे देण्याचे काम प्रशिक्षण न झालेल्या व्यक्तीच करतात. त्यामुळे त्यांना औषधांची माहिती नसते. तसेच औषधी निर्मितीतला पदवीधर देखील डॉटर नसतो व त्यामुळे त्याला रुग्णावर उपचार करण्याचा कायदेशीर अधिकार तर नसतोच, पण तेवढे ज्ञानही नसते. त्यामुळे वर उल्लेखल्याप्रमाणे किस्से घडतात. कधीकधी प्राणहानीही होऊ शकते. त्यामुळे औषध विक्रेत्याकडून डॉटरी सल्ल्याखेरीज व मार्गदर्शनाखेरीज कोणतीही औषधे घेऊ नयेत.