बालविवाह होवू देणार नसल्याचा पारधी समाजातील जातपंचायतचा निर्णय

0
50

समाजाच्या प्रश्नावर पंच कमिटी, प्रशासन, सामाजिक संस्था व समाजबांधवांची सकारात्मक खुली चर्चा

पारधी समाजाच्या प्रश्नावर पंच कमिटी, प्रशासन, सामाजिक संस्था व समाजबांधवांची खुली चर्चा करताना प्रशासकीय अधिकारी, न्यायाधीश व उपस्थित समाजबांधव.

नगर – क्राय (मुंबई) संस्थेच्या वतीने पारधी समाज, पंच कमिटी व प्रशासकीय अधिकारी यांच्या संयुक्तपणे बालविवाह व बालकामगार प्रश्नावर चर्चासत्र पार पडले. अरणगाव रोड, साई लॉन येथे झालेल्या या चर्चासत्रात पारधी समाजातील जातपंचायतच्या पंच मंडळाने बालविवाह होवू देणार नसल्याचा ठराव घेतला. यावेळी पंच कमिटी, प्रशासन, सामाजिक संस्था व समाज यांची सकारात्मक खुली चर्चा घडली. या चर्चा सत्राचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नगर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक संपत भोसले, दीपक कालेकर, सुनील भालेराव, क्राय संस्थेचे सल्लागार राजेंद्र काळे, बाल न्यायमंडळाच्या बेबीताई बोरुडे, अ‍ॅड. अनुराधा येवले, सुखास शिंदे, संतोष काळे, चंद्रकांत काळे, अजित भोसले, नंदा साळवे, मंदा कांबळे, स्वाती नेटके, समाधान काळे आदींसह पारधी समाजबांधव व महिला उपस्थित होत्या. न्यायाधीश भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, धोरणात्मक निर्णय कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. पारधी समाजातील नागरिकांना स्वत:ची ओळख मिळण्यासाठी तातडीने एक शिबिर घेऊन त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड देण्याचे काम केले जाणार आहे. संवेदनशीलतेने पारधी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने दोन पाऊल पुढे राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पोलीस उपाधीक्षक संपत भोसले यांनी पारधी समाजावर लागलेला गुन्हेगारीचा कलंक शिक्षणातून पुसला जाणार आहे. शिक्षणातून समाजाला प्रगती साधता येणार असून, भावी पिढीच्या भवितव्याचा विचार करुन पारधी समाजाने वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले. राजेंद्र काळे म्हणाले की, पारधी समाजातील प्रश्न सुटण्यासाठी समाजातील पंच मंडळ व शासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. आदिवासी, पारधी समाजामध्ये बालविवाह, बालकामगार हा गंभीर प्रश्न बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी क्राय संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा समाजातील दुर्बल घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी जागृती सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेसाठी भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.