प्रशासकिय खर्चात कपातीच्यादृष्टीने नगर अर्बन बँकेच्या १३ शाखा बंद

0
31

नगर – रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केल्यानंतर केंद्रीय सहकार खात्याने बँकेवर अवसायकांची नेमणूक केली आहे. बँकेचा पुढील सर्व कारभार हा अवसायकांच्या नियंत्रणाखाली सुरू झालेला असून बँकेच्या दैनंदिन प्रशासकीय खर्चात कपात करणे तसेच आवश्यक त्या सर्व उपायांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बँकेच्या भाडेतत्त्वावर कार्यालय असलेल्या तब्बल १३ शाखा बंद करण्याचा निर्णय अवसायकांनी घेतला आहे. बंद होत असलेल्या शाखांचे पुढील व्यवहार नजिकच्या शाखांमधून तसेच मुख्य शाखेतून होणार असल्याची माहिती बँक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बंद होत असलेल्या शाखांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सावेडी, काष्टी, कर्जत, टाकळीमानुर, राहुरी, सोनगाव, सोनई, राहाता या शाखांचा समावेश आहे. बँकेच्या बीड जिल्ह्यातील बंद होणार्‍या शाखांमध्ये कडा व परळी वैजनाथ या शाखांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व पुणे जिल्ह्यातील शिरूर व गुलटेकडी (मार्केट यार्ड) शाखा देखील बंद करण्याचा निर्णय अवसायकांनी घेतलेला आहे. शाखा बंद करण्याच्या निर्णयामुळे बँकेच्या खर्चात मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे. बँकेतील सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असून डी आय सी जी सी व केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांच्या नियमानुसार व आदेशानुसार वितरण करण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व ठेवीदारांनी केवायसीची पूर्तता करून आपले लेम फॉर्म नजिकच्या शाखेमध्ये लवकरात लवकर भरून द्यावेत असे आवाहन अवसायक यांनी केले आहे.