ग्रामसेवकासह प्राध्यापकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

0
37

नगर – विहीर खोदण्याचा प्रस्ताव मंजूर करून पंचायत समितीकडे पाठवण्यासाठी जामखेड तालुयातील वाघा ग्रामपंचायतचा ग्रामसेवक व प्राध्यापक असलेल्या खासगी व्यक्तीने १५ हजारांच्या लाचेची मागणी केली. बुधवारी (दि.२८) सदर प्राध्यापकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच ग्रामसेवकालाही अटक करण्यात आली आहे. ग्रामसेवक नेताजी शिवाजी भाबड (वय ५०, रा.भोरे मिस्त्री यांची रुम, तपनेश्वर रोड, जामखेड) व प्राध्यापक शामराव माणिकराव बारस्कर (वय ५३, रा.वाघा, पो.नान्नज, ता.जामखेड) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार याच्या पत्नीच्या नावाने वाघा येथे दोन हेटर क्षेत्र असून या क्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक जलसिंचन विहीर खोदण्याकरिता त्यांनी प्रस्ताव ग्रामपंचायत वाघा येथे सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर करून पंचायत समिती येथे पाठवण्यासाठी लाच मागण्यात आली होती. २२ व २३ फेब्रुवारी रोजी लाच मागणी पडताळणी होऊन बुधवारी सापळा कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, निरीक्षक राजू आल्हाट, शरद गोर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.