कुत्र्याला मिळाला धडा

0
76

कुत्र्याला मिळाला धडा

एका गावात एक कुत्रा राहत होता. त्याचे नाव होते मोती. गावभर हिंडे, खाऊन-पिऊन आनंदात राही. अशा प्रकारे त्याची चंगळ होती. पण हे सुख त्याला फार काळ नाही लाभले. दिवस पालटले. त्या गावात मोठा दुष्काळ पडला. खाण्यास काहीच मिळेना. गुरे-माणसे पटापट मरू लागली. यातच अनेक कुत्रीही मरून पडली. मोतीने ही परिस्थिती पाहिली. जीव वाचवण्यासाठी काही तरी केले पाहिजे, असे मनात येताच त्याने ते गाव सोडले. तो दुसर्‍या एका गावात गेला. स्वागत तर चांगले झाले. लोकांनी त्याला भाकरीचे तुकडे दिले. त्या गावात लोक होते, तशाच गायी होत्या, म्हशी होत्या, गाढवे होती. कोणी त्याला हुंगून प्रेम व्यक्त केले; तर कोणी नुसतेच पाहिले. हे बघून त्याला आनंद झाला. याच गावात राहावे, असे त्याने ठरविले. परंतु हाय रे दैवा! तिथे दुसरेच संकट सामोरे आले. तेथील कुत्र्यांना याचा वास येताच पाच-पन्नास कुत्र्यांचा कळपच त्याच्या अंगावर धावून आला. त्याला घेरले. चारी दिशांनी हल्ला करून सापडेल तिथे चावा घेत सुटले. शेपूट घालून तो इकडे-तिकडे धावू लागला. कसाबसा जीव बचावून मरणाच्या दारातून परत आपल्या मूळच्या गावी आला. त्याला पाहून त्याचे मित्र प्रेमाने त्याची चौकशी करू लागले. तेव्हा मध्येच कोणी तरी म्हणाले, “ते दुसरे गाव कसे आहे रे?” “मित्रांनो, गाव तसे बरे आहे. खायला प्यायला भरपूर मिळते. लोक प्रेम दाखवतात. पण एक गोष्ट मात्र चांगली नाही.” “ती कोणती गोष्ट?” “मित्रांनो, तिथेही आपले जातभाई मोठ्या प्रमाणात आहेत.” “अरे, मग तर यात आनंदच आहे.” “बाबा रे, हीच तर अडचण आहे. सार्‍या जगाशी एकवेळ पटेल; पण आपल्या जातभाईंशी पटत नाही. भावाचे भावाशी जमत नाही आणि म्हणूनच भाऊबंदकी वाढते. इतरांची तर्‍हाच वेगळी. त्यांचे प्रश्न वेगळे. अडचणी, सुख-दुःखे वेगळी. त्यांना आपल्या सुख-दुःखांबद्दल सोयरसुतक नसते. पण भाऊबंदाचे तसे नसते. “भाऊबंदांना वाटते, हा कशाला आला इथे? आता आपल्यात वाटेकरी होणार. तेवढेच आपले कमी होणार. दुसरीकडे जाईल किंवा मरेल, तर बरे. म्हणून इतरांवर विश्वास ठेवलेला बरा; पण भाऊबंदांवर कधीही विश्वास टाकू नये. तेच आपले एक नंबरचे शत्रू असतात.” “बरं, मग आता इथेच राहतोस काय?” “होय बाबा. खायला कमी मिळाले, तरी चालेल; पण जिवाची भीती तर नाही. तिथे जिवाला सुरक्षितता नाही आणि म्हणूनच मी पुन्हा आपल्या गावी आलो.” सर्वच कुत्र्यांना त्याचे म्हणणे पटले. हा त्यांच्यापैकीच असल्याने त्यांनी त्याला आनंदाने तेथे ठेवून घेतले. तात्पर्य – हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे जातभाई प्रसंगी गळा कापायलाही मागे-पुढे पाहत नाहीत.