खून करून पसार झालेल्या दोघांना उत्तरप्रदेशातील आग्र्यात पकडले

0
29

एमआयडीसीतील खुनाचा अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी लावला छडा

नगर एमआयडीसी परिसरात संदीप ऊर्फ बाळु कमलाकर शेळके याचा खून करणार्‍या दोघांना आग्रा (उत्तर प्रदेश) येथून पकडून आणल्यानंतर त्यांच्या समवेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.

नगर – नगर एमआयडीसी परिसरात सह्याद्री चौकातील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या आवारात संदीप ऊर्फ बाळु कमलाकर शेळके याचा दगडाने ठेचून निर्घुणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली होती. या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ३ दिवसांत उलगडा केला असून खून करून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पळून गेलेल्या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. विशाल चिंतामण जगताप (वय २२, रा. चेतना कॉलनी, दांगट मळा, एमआयडीसी) व साहील शेरखान पठाण (वय २०, रा. लेडोंळी मळा, नागापुर, एमआयडीसी) अशी दोघांची नावे आहेत. खुनाची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांनी सुरु केला. त्यासाठी स.पो.नि.हेमंत थोरात व अंमलदार रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, भिमराज खर्से, फुरकान शेख, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, सागर ससाणे, आकाश काळे, प्रशांत राठोड व अर्जुन बडे यांचे पथक नियुक्त केले. या पथकाने घटना ठिकाणी आजु बाजूस राहणारे लोकांकडे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करत असताना मयत संदीप शेळके हा २१ फेब्रुवारी रोजी विशाल जगताप व साहील पठाण यांचे सोबत देशी दारुचे दुकानात दारु पित बसलेले होते अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. या पथकाने सदर माहितीच्या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे स.पो. नि.माणिक चौधरी व अंमलदार यांना सोबत घेवुन विशाल जगताप व साहील पठाण यांचा त्यांचे राहते घरी व आजु बाजूस शोध घेता ते २ दिवसांपासुन घरी नसल्याची माहिती मिळाल्याने त्यांचे विषयी पथकाचा संशय बळावला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास करता संशयीत इसम हे शहागंज मोहल्ला, जिल्हा आग्रा, राज्य उत्तर प्रदेश येथे असले बाबत खात्री झाल्याने पथकाने सदर ठिकाणी जावुन संशयीतांचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या विशाल जगताप व साहील पठाण यांचेकडे या गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता संशयीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना अधिक विश्वासात घेवुन गुन्ह्याबाबत चौकशी करता त्यांनी मयत संदीप शेळके यास अनैर्सिंक संभोग करण्याचे उद्देशाने जास्त दारु पाजुन एमआयडीसी येथील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीचे पडके इमारतीत नेवुन त्याचे कपडे काढण्याचा जोर जबरदस्तीने प्रयत्न करताना संदीप याने विरोध करताच आरोपींनी जवळ असलेल्या नायलॉन पट्टीने गळा आवळुन व दगडाने डोके व चेहरा ठेचुन त्याला जिवे ठार मारले असल्याचे सांगितले. या आरोपींना पुढील तपासकामी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.