आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरूणावर कोयता, कुऱ्हाडीने हल्ला

0
42

नागापूर परिसरातील घटना; ५ जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

नगर – आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरूणावर कोयता, कुर्‍हाडीने खूनी हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. २१) रात्री साडेआठच्या सुमारास नागापूरच्या पितळे कॉलनीत घडली. देवेंद्र भगवान शर्मा (रा. कातोरे वस्ती, बोल्हेगाव) असे हल्ला झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुरूवारी (दि. २२) दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रवी अंकुश आंधळे, संतोष अंकुश आंधळे (दोघे रा. जिरेवाडी ता. पाथर्डी) व तीन अनोळखी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास देवेंद्र शर्मा हे नागापूरच्या पितळे कॉलनीत असताना रवी आंधळे, संतोष आंधळे व इतर तिघे तेथे आले. त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाले. पाच जणांनी मिळून शर्मा यांच्यावर कोयता, कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला केला. जखमी शर्मा यांच्या पत्नीला घटनेची माहिती मिळताच त्या घटनास्थळी आल्या. त्यांनी शर्मा यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोढे करीत आहेत.