प्रत्येक घरातील महिला ‘राजमाता जिजाऊ’ बनल्या तर शिवबासारखे व्यक्तीमत्व घडतील : माधवराव लामखडे

0
55

काव्य संमेलन व शाहिरी जलसा मधून उलगडली शिवाजी महाराजांची शौर्यगाथा

नगर – प्रत्येक घरात महिला राजमाता जिजाऊ बनल्या तर शिवबा सारखे व्यक्तीमत्व असलेले मुले घडतील. यासाठी पालकांनी मुलांसमोर शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवावा. मोबाईलच्या युगात अडकलेल्या मुलांना जिजाऊंची प्रेरणा घेऊन महिलांनी आवडीच्या क्षेत्राकडे प्रोत्साहन देण्याचे माधवराव लामखडे यांनी आवाहन केले. निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमि त्त चौथे राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात पार पडले. तर यावेळी शाहिरी जलसा कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा इतिहास उलगडण्यात आला. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काव्य संमेलन व शाहिरी जलसाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, काव्य संमेलनाचे अध्यक्ष तथा गझलकार रज्जाक शेख, सामाजिक वनीकरणचे वन क्षेत्रपाल हेमंत उबाळे, उद्योजक बाळासाहेब शहाणे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, उपसरपंच प्रमोद जाधव, डॉ. विजय जाधव, सोसायटीचे चेअरमन गुलाब कापसे, दिलावर शेख, अतुल फलके, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, कवयित्री वैशाली कंकाळ आदींसह कवी, शाहीर व ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रुजविण्यासाठी निमगाव वाघात झालेला उपक्रम दिशादर्शक आहे. कलाकारांना प्रोत्साहन देऊन शिवाजी महाराजांचा इतिहास समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी काव्य संमेलन व शाहिरी जलसाने साजरी करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या काव्य संमेलनात आनंदा साळवे, गिताराम नरवडे, शिवदास कांबळे, बलभिम निमसे, देवीदास बुधवंत यांनी कवितेतून सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवून कवींनी सामाजिक व्यथा मांडल्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर कविता सादर केल्या. या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे प्रारंभ शिवशाहीर विक्रम अवचिते व त्यांच्या सहकलाकारांच्या रयतेचा राजा. या शाहिरी पोवाड्यांनी झाले. शिव व्याख्याते अभय जावळे यांचा राजा शिवछत्रपती व धर्मवीर संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास व्याख्यान रूपाने मांडला असता उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. बाल शाहीर ओवी काळे हिने सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. एकापेक्षा एक सरस सादरीकरण झालेल्या कविता व पोवाड्यांना उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा सोनवणे यांनी केले. आभार संदीप डोंगरे यांनी मानले.