वेदना का होते?
पोळले की आपल्याला चटका बसतो. सरांनी हातावर छडी मारली तर दुखते. कान पिळला तरी दुखते. कधीकधी पोट दुखते. कधी डोके दुखते, तर कधी मान मुरगळते. इंजेशन देताना सुई टोचल्यावर दुखते, तसेच काटा मोडल्यास टाचेतही दुखते. जखम झाल्यावर दुखते, तसेच खूप दाब पडल्यासही दुखते. आपल्या दैनंदिन आयुष्यात असे वेदनेचे प्रसंग वारंवार येत असतात. शरीराच्या प्रत्येक भागात मज्जातंतूंचे जाळे असते. त्वचा असो वा जठर, आतडे असे अवयव असो किंवा रक्तवाहिन्या, हृदय असो. या सगळ्यांमध्ये मज्जातंतू असतात. या मज्जातंतूंमधून तापमान, दाब, ताण इत्यादींपासून निर्माण होणार्या अप्रिय संवेदना (ज्याला आपण वेदना म्हणतो…) मेंदूपर्यंत पोचवल्या जातात. मेंदूमध्ये या संवेदनांचे विश्लेषण होते व स्नायूंना, अवयवांना काय करावयाचे यासंबंधी आदेश दिले जातात. त्यामुळेच आपण चटका बसल्यावर हात विस्तवापासून दूर नेतो, हातावर दाब देणारी वस्तू बाजूला ठेवतो किंवा वेदना निर्माण करणार्या वस्तूपासून दूर जातो. याचाच अर्थ, वेदना होणे ही शरीराचे संरक्षण करण्यासाठीची एक यंत्रणा आहे. मज्जातंतू असल्यानेच आपल्याला वेदना समजते. कुष्ठरोग्याच्या मज्जातंतूंवर विपरीत परिणाम होऊन ते नष्ट झाल्याने त्याला संवेदना नसतात.
त्यामुळे हाताचे बोट कापले गेले वा जळाले तरी त्याला कळत नाही व शारीरिक विकृती निर्माण होतात. जठर, आतडे, फुफ्फुस इत्यादी इंद्रियांमध्ये वेदनेचा संबंध जखमेपेक्षा ताणाशी जास्त असतो. ताणले गेल्यावर या इंद्रियांत वेदना होते. प्रोस्टाग्लँडीनसारखी काही द्रव्ये देखील वेदना होण्यास कारणीभूत असतात. हृदयाला गरजेपेक्षा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाला की छातीत दुखते. याचे कारण म्हणजे हृदयाच्या स्नायूंच्या पेशींना पुरेसा प्रमाणात प्राणवायू मिळत नाही. वेदना होण्याचे हेही महत्त्वाचे कारण होय. जंतूसंसर्गात, मार लागल्यास निर्माण होणार्या दाबामुळेही सूज येते व वेदना होते. वेदना कमी होणे हे साधारणतः रोग बरा होत असल्याचे लक्षण समजतात. पण एक लक्षात ठेवायला हवे, वेदना हा रोग नाही, ते एक लक्षण आहे. रोग बरा करणे हे उपचाराचे मुख्य ध्येय असते. रोग बरा झाला की लक्षणे आपोआपच कमी होतात. अशी आहे ‘व्यथा’ वेदनेची!