माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

0
51

मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (वय ८६) यांचे २३ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजून २ मिनिटांनी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. दोनच दिवसांपूर्वी मनोहर जोशींना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, या उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिमेला रुपारेल कॉलेजजवळील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. दादर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला. मुंबईतील किर्ती कॉलेजमध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी पूर्ण केली. त्यानंतर मुंबई महापालिकेत लार्कची नोकरी केली.

मनोहर जोशी यांना उद्योजक होण्याची इच्छा असल्यामुळे दूध, फटाके, हस्तीदंतीच्या वस्तूंच्या विक्रीचे अनेक व्यवसाय त्यांनी करुन पाहिले. २ डिसेंबर १९६१ ला नोकरी सोडून कोहिनूर लासेसला सुरुवात केली. १९६७ साली शिवसेनेत प्रवेश केला. दोनदा नगरसेवक, तीनदा विधानपरिषद सदस्य, १९७६-७७ मध्ये मुंबईचे महापौर, दोनदा विधानसभा सदस्य, १९९०-९१ मध्ये विरोधी पक्षनेते पद अशी पदे त्यांनी सांभाळली. १९९५ मध्ये शिवसेना भाजपाच्य युतीचे सरकार सत्तेत आले, तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर १९९९-२००२ दरम्यान अवजड व सार्वजनिक उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री, २००२-२००४ दरम्यान लोकसभेचे अध्यक्ष आणि २००६- २०१२ राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.