अहमदनगर शहरातील विकासकामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर

0
50

नगर – नगर विकास विभागाकडून महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. महापालिका क्षेत्राचा विकास आता अधिक जलद गतीने होणार आहे. शासनाकडून नागरी मुलभूत सेवा सुविधांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच महापालिकेला वर्ग केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर महापालिका क्षेत्रात अनेक कामे निधीच्या अभावामुळे रखडली होती. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत आणि माझ्यामार्फत महापालिकेला नागरी मुलभूत सेवा सुविधांच्या कामासाठी निधी मिळण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद देत सदर निधी मंजूर केला आहे. सदर निधीतून शहरातील रस्ते, जलवाहिन्या, गटारे, सभामंडप आणि इतर विविध नागरी कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे नागरिकांना भेडसावणार्‍या विविध समस्या कमी होऊन शहराचा विकास साधला जाईल, असा विश्वास खासदार डॉ. विखे पाटील यांनी व्यत केला. निधीसाठी योग्य तो पाठपुरावा केल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अहमदनगर निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे आणि प्रिया जानवे व मयुर बोचकुळ यांनी आभार व्यक्त केले.