नगरचे कथक नृत्यालय पुण्यातील ‘नृत्यचक्र’ कार्यक्रमात झळकणार

0
30

लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार नोंद

नगर – नृत्यचक्र हा कथक नृत्यावर आधारित एक भव्य दिव्य कार्यक्रम २५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे सायं.४ वा.आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील तब्बल वीस शहरांमधील सुमारे बाराशे कथक नृत्यांगना यामध्ये एकत्रितरित्या नृत्य संरचना सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी आपल्या शहरातील कथक नृत्यालय अहमदनगर या संस्थेच्या संचालिका सौ. कल्याणी कामतकर (निसळ) यांच्या नेतृत्वासह एकूण ३२ विद्यार्थिनी आपली कला सादर करणार आहेत. यात मीरा भजन यांवरील आधारित नृत्य सादर होणार आहे. नृत्यचक्र या कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये कथक नृत्याचे नाव नोंदविले जावे यासाठी हा एक प्रयत्न आहे. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना श्रीमती ज्योती मन्सुखानी यांची असून श्रीमती अस्मिता ठाकूर यांच्या साथीने ती प्रत्यक्षात उतरत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती तेजस्विनी साठे, डॉटर माधुरी आपटे, श्रीमती रसिका गुमास्ते यांचाही सक्रिय सहभाग तसेच मोलाचे सहकार्य लाभले. अमोद कुलकर्णी यांनी नृत्यचक्र या कार्यक्रमासाठी संगीत संयोजन केलेआहे. पुण्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुरु या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नगरकर रसिकांनी नृत्य साधकांनी आणि शिक्षकांनी या कार्यक्रमाचा नृत्यचक्र या फेसबुक पेज वरून थेट प्रक्षेपणाचा आनंद घ्यावा असे आवाहन सौ.कल्याणी कामतकर यांनी केले आहे.