शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी फुंकणारा माणूस हे नवे निवडणूक चिन्ह

0
32

मुंबई – शरद पवार यांच्या ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने ’तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केले आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १५ फेब्रुवारी दिलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केले. यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून पक्षाच्या नाव्या नावाचे आणि चिन्हाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले होते. त्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार हे नाव काही दिवसांपूर्वीच आयोगाने दिले. पण चिन्ह बहाल केले नव्हते. दरम्यान, नार्वेकरांच्या निकालाविरोधात शरद पवार गटाकडून दाखल याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने शरद पवारांच्या पक्षाचं सध्याचं नाव येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काम ठेवतानाच लवकरात लवकर चिन्ह देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार, गुरुवारी (दि.२२) रात्री उशीरा निवडणूक आयोगाने पवारांच्या गटाकडून दिलेल्या पर्यायांचा विचार करता ’तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहाल केले.