नगर – जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समिती मार्फत पोलीस दलासाठी नव्याने ४२ चारचाकी व ६३ दुचाकी अशी एकूण १०५ वाहने देण्यात आली असून त्याचे लोकार्पण गुरुवारी (दि.२२) दुपारी पोलीस मुख्यालय मैदानावर करण्यात आले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, खा. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, आ.संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस उपअधीक्षक, पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीमार्फत पोलिस दलासाठी सुसज्ज अशा चारचाकी वाहनांमध्ये १ महिंद्रा थार, ५ स्कॉर्पिओ, ३६ बोलेरो तसेच ६३ मोटारसायकल अशा एकूण १०५ वाहनांचा समावेश आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलिस ठाण्यांना ही नवी वाहने वितरीत केली जाणार आहेत. त्यामुळे पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी यांना काही घटना घडल्यास तात्काळ घटनास्थळी पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.