२ दिवसांत विविध ठिकाणाहून गेल्या ५ मोटारसायकल चोरीला
नगर – नगर शहर परिसरातून मोटार सायकल चोरीला जाण्याचे सत्र सुरूच असून गेल्या २ -३ दिवसांत विविध ठिकाणाहून ५ मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोटारसायकल चोरांना पकडून या चोर्या रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. शहरातील सर्जेपुरा भागात असलेल्या हितेश मेडिकल समोर उभी केलेली होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटारसायकल (क्र. एम.एच.१६ बी.एफ.३७९४) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.१७) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत रविंद्र ज्ञानदेव रोकडे (रा.आलमगीर पाण्याच्या टाकीजवळ नागरदेवळे) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोटार सायकल चोरीची दुसरी घटना तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतच तपोवन रोडवरील डोके नगर येथे रविवारी (दि.१८) पहाटे घडली आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर हिरामण शिंदे यांच्या मालकीची हिरो कंपनीची एच. एफ. डिलस मोटारसायकल (क्र. एम.एच.२० एफ.व्ही. ५११४)अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी चोरून नेली आहे.
तिसरी घटना सावेडी उपनगरातील धर्माधिकारी मळा येथे घडली. या ठिकाणी शिवम टॉवर च्या पार्किंगमध्ये लावलेली चंदन कुमार देव यांच्या मालकीची होंडा कंपनीची मोपेड (क्र. एम.एच.१६ ए. के.५८००) अज्ञात चोरट्याने रविवारी (दि.१८) पहाटे चोरून नेली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोटार सायकल चोरीची चौथी घटना कल्याण रोडवर श्रीकृष्ण नगरी येथील शिवतीर्थ अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये घडली. या ठिकाणी लावलेली बाळासाहेब सुखदेव शिंदे (रा. देवगाव, ता.नगर) यांच्या मालकीची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल (क्र. एम.एच.१६ सी. पी.७७६५) अज्ञात चोरट्याने रविवारी (दि.१८) दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार सायकल चोरीची पाचवी घटना भिंगार येथील जॉगिंग पार्क च्या मैदानावर शनिवारी (दि.१७) दुपारी ४ ते ४.३० च्या सुमारास घडली आहे. या ठिकाणी प्रशांत मुरलीधर डमाळे (रा. रेणावीकर कॉलनी, निर्मलनगर) यांनी लावलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एम.एच.१७ ए. एस. ९८२८) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.