मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
33

काही व्यक्तींना उंचीची भीती का वाटते?

भीती वाटणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येकाला
कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते.
अंधाराची, सापाची, वाघाची, आजारपणाची अशा
अनेक प्रकारच्या भीतीने लोक ग्रासलेले असतात.
काही लोकांना उंचीची भीती वाटते. डोंगरावर
गेल्यानंतर काही व्यक्ती घाबरून जातात. आपल्यापैकी
कोणीही १०० मजली इमारतीच्या छतावर जाऊन
खाली पाहू लागला, तर त्याला नक्कीच भीती वाटेल;
पण पाचव्या मजल्यावर गेल्यावर क्वचितच कोणाला
भीती वाटेल. उंचीची भीती वाटणारी व्यक्ती नुसते
गिर्यारोहणाचे नाव काढताच घामाघूम होते. अशी
भीती वाटणार्‍या व्यक्तींमध्ये उंचावर गेल्यास झोप न
येणे, भूक न लागणे, वाईट स्वप्न पडणे, हातपाय
थरथरणे, खूप घाम येणे; ही लक्षणे दिसतात.
रक्तदाबही वाढतो. वागण्यात चिडचिडेपणा येतो.
एखाद्या वस्तूविषयी अवास्तव भीती बाळगणे, यालाच
‘फोबिया’ असे म्हणतात.
तणावग्रस्त मानसिकता असण्याचे हे उदाहरण
होय. हा एक प्रकारचा सौम्य असा मनोविकारच
आहे. मनाचा विग्रह करून ही भीती काढण्याचा
प्रयत्न केल्यास ती कमी होऊ शकते. मनोविकार
तज्ज्ञाचा सल्ला घेणे अशा वेळी श्रेयस्कर ठरते,
अन्यथा हा मानसिक रोग गंभीर रूप धारण करू
शकतो.