नगरच्या दाम्पत्याला घाटात लुटणारे ३ सराईत गुन्हेगार पकडले

0
46

लुटीतील २ तोळे सोन्याचे दागिने केले हस्तगत

नगर – नगर तालुयातील कोल्हार घाटामध्ये महिलेच्या गळ्यातील दागिने बळजबरीने चोरणारे तीन सराईत गुन्हेगार एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. अक्षय ऊर्फ दीपक यशवंत आव्हाड (रा. सोनगाव पाथरा, ता. राहाता), फिरोज ऊर्फ लखन अजिज शेख, अमर चिलु कांबळे (दोघे रा. मुकिंदपूर, ता. नेवासा) अशी जेरबंद केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. सारंगधर वांढेकर व त्यांच्या पत्नी संगीता (दोघे रा. विद्या कॉलनी, कल्याण रस्ता, नगर) हे त्यांच्या दुचाकीवरून २१ जानेवारी रोजी दुपारी जेऊर बायजाबाई ते कोल्हार जाणार्‍या रस्त्यावरून जात असताना त्यांना अनोळखी तिघांनी कोल्हार घाटात गाठले. गाडीला कट मारल्याचा बहाणा करून संगीता यांच्या गळ्यातील दागिने बळजबरीने हिसकावून कोल्हार रस्त्याच्या दिशेने पळुन गेले होते.

याप्रकरणी संगीता यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपासादरम्यान अक्षय उर्फ दीपक यशंवत आव्हाड, फिरोज उर्फ लखन अजिज शेख व अमर चिलु कांबळे यांनी गुन्हा केल्याची माहिती समोर आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार नंदकुमार सांगळे, राजु सुद्रीक, विष्णु भागवत, महेश बोरूडे, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, जयसिंग शिंदे, सुरज देशमुख, भगवान वंजारी तसेच मोबाईल सेलचे अंमलदार राहुल गुंड्डू, नितीन शिंदे यांनी संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबूली देत दोन तोळ्याचे दागिने काढून दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.