नगर – नगर ते पाथर्डी जाणार्या रोडवर भिंगार परिसरात विजय लाईन चौकात एकाला रात्रीच्या वेळी मारहाण करत लुटणार्या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून लुटीतील २० हजारांचा महागडा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. किरण सुरेश चावरे (वय २१,रा. श्रीराम कॉलनी, भिंगार) व अल्पवयीन मुलगा असे आरोपींची नावे आहेत. याबाबत रामेश्वर सुधाकर ढवळे (वय ३६, रा वडगांव बुद्रुक, जि. पुणे) यांनी २२ डिसेंबर रोजी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांना त्या दिवशी पहाटे १ च्या सुमारास पाथर्डीहून नगरमार्गे पुणेकडे जाताना भिंगारच्या विजयलाईन चौकात अडवून मारहाण करत लुटण्यात आले होते. तेव्हापासून आरोपी फरार होते. १६ फेब्रुवारी रोजी भिंगार पोलीस स्टेशनचे स.पो.नि.योगेश राजगुरु यांना गोपनिय माहीती मिळाली की, सदर गुन्ह्यातील फरार दोन सशंयित इसम हे विजयलाईन चौकात येणार आहेत.
ही माहिती मिळाल्याने स.पो.नि. राजगुरु यांनी तात्काळ पथकाला कारवाईसाठी पाठविले. या पथकाने सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन किरण सुरेश चावरे व अल्पवयीन मुलगा या दोघांना पकडले. त्यांच्याकडून लुटीतील मोबाईल हस्तगत केला असून हा गुन्हा त्यांनी आणखी एका साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे समोर आले आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सदरची कारवाई स.पो.नि. योगेश राजगुरु यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल बोरसे पोलीस अंमलदार संदिप घोडके, दिपक शिंदे, समीर शेख. अमोल आव्हाड, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, कांतीलाल चव्हाण, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे.