चिट फंडाच्या रकमेपोटी दिलेले चार धनादेश वटले नाही; आरोपीस शिक्षा

0
40

नगर – मौजे लोणी (ता. राहाता) येथील धीरज नंदकिशोर सोनी यांनी श्रीराम चिटस् कंपनीला दिलेल्या चार धनादेश न वटलेमुळे प्रत्येक धनादेशापोटी ३ महिने सश्रम कारावास व रुपये ८० हजारचा दंड तसेच दंडाची रक्कम न दिल्यास १ महिना साध्या कैदेची शिक्षा नगर येथील अति.चिफ ज्युडी. मॅजी. मंदार पांडे यांनी नुकतीच महत्वपुर्ण आदेशाद्वारे सुनावली आहे. निकालाप्रमाणे दंडाची रक्कम वसुल झाल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून कंपनीला देण्याचाही आदेश केलेला आहे. याविषयी सविस्तर हकीगत अशी की, श्रीराम चिटस् लि. ही कंपनी नगर मध्ये भिशीचा व्यवसाय करते आरोपी धीरज सोनी यांनी रुपये ५ लाखाच्या भिशीमध्ये सहभाग घेऊन लिलावाद्वारे भिशी उचलली होती. कंपनीने भिशीची रक्कम त्यांच्या खात्यात जमाही केलेली होती. दरम्यान श्री. सोनी यांनी ठरल्याप्रमाणे भिशीच्या हप्त्याची परतफेड केली नाही म्हणून कंपनीने थकीत रकमेची मागणी केली असता त्यांनी प्रत्येकी रुपये ५०,०००/- चे चार धनादेश कंपनीचे नावाने दिले पंरतू चारही धनादेश त्यांचे खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने न वटता परत आले. कंपनीने वकीलांमार्फत नोटीस पाठवुन रकमेची मागणी केली परंतू श्री. सोनी यांनी नोटीसीप्रमाणे रक्कम दिली नाही म्हणून कंपनीने अ‍ॅड.सुनिल बी.मुंदडा यांचेमार्फत चार स्वतंत्र फौजदारी गुन्हे अहमदनगर येथील न्यायालयात दाखल केले त्याची गुणदोषावर सुनावणी झाली.

श्री. सोनी यांनी कंपनीस कोणतीही रक्कम देणे लागत नाही असा घेतलेला बचाव न्यायालयाने फेटाळून लावला. आणि प्रत्येक केसमध्ये आरोपीविरुध्द चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा कलम १३८ नुसार गुन्हा शाबित झाल्यामुळे प्रत्येक केसमध्ये स्वतंत्र निकाल देऊन आरोपीस तीन महिने सश्रम कारावास आणि प्रत्येकी रुपये ८० हजार रुपयाचा दंड केला आहे. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा दिलेली आहे. या निकालामुळे भिशीच्या रकमेची परतफेड न केल्यास शिक्षा होऊ शकते असा संदेश समाजात गेलेला आहे. श्रीराम चिटस् कंपनी लि. तर्फे अ‍ॅड. सुनिल मुंदडा यांनी काम पाहिले आणि कंपनीचे जनरल मुखत्यार केदार खाडे यांनी सहकार्य केले.