जीवनात सफलतेबरोबरच सदाचार देखील महत्वाचा

0
50

खाकीदास बाबा मठात श्रीमद देवी भागवत कथा सप्ताहास सुरुवात

लालटाकी भागातील श्री खाकीदास बाबा मठात वैष्णवी सुंदरकांड भजन मंडळ आयोजित श्रीमद् देवीभागवत कथेचे प्रथम पुष्प गुंफताना वैष्णवाचार्य श्री युगुलशरणजी महाराज. समवेत दीपप्रज्वलन करताना श्रीगोपाल धूत, मोहनलाल मानधना, श्रीगोपाल जाखोटीया, जगन्नाथ बजाज, धनेश लढ्ढा, दीपक काबरा, सौ. गीता गिल्डा, सौ. सरला बजाज आदी.

नगर – पैसे कमावणारा प्रत्येक जण सदाचारी असतोच असे नाही. माणसाने आपल्या जीवनात कर्तृत्वाच्या जोरावर अर्थ प्राप्ती केली की त्या मागे सफलता येतच असते. पण जीवनात सफलता बरोबरच सदाचार देखील महत्वाचा आहे, असे विधान वैष्णवाचार्य श्री युगुलशरणजी महाराज यांनी केले. येथील लालटाकी भागातील न्यू आर्टस् कॉलेज शेजारील श्री खाकीदास बाबा मठात वैष्णवी सुंदरकांड एवं भजन मंडळ आयोजित श्रीमद देवी भागवत कथेचे पहिले पुष्प युगुलशरण महाराज यांनी गुंफले त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, टाटा बिर्ला परिवाराने पैसा कमावून जीवनात सफलता मिळवली सोबत सदाचार देखील साधला. अनेक राज्यात त्यांच्या यशस्वी उद्योगासोबत त्यांनी मंदिरे देखील उभारली, बिर्ला मंदीर किती भव्य दिव्य आणि सुंदर असतात. त्यांचा हाच सदाचार त्यांना उत्कर्ष प्राप्त करून देतो. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक कार्य सिद्धीस जाते. वैष्णवी भजनी मंडळाने आयोजित केलेले देवी भागवत निश्चित फलदायी ठरेल कारण देवीची आराधना म्हणजे भक्ती आणि शक्तीचे एकरूपत्व आहे. श्रीमद भागवत कथा, श्रीराम कथा सर्वच ठिकाणी सहज आयोजित केली जाते मात्र देवी भागवत क्वचितच होते. ज्या घरात देवी मातेची पूजा होते ते साक्षात वैष्णव धाम होऊन जाते. या देवी भगवती कथेला उपस्थित आपण मातेच्या दर्शनासाठी नाही गेलो तर माता स्वतः आपल्याला दर्शन देण्यासाठी आली आहे. साक्षात ग्रंथाच्या रूपाने देवी माता या ठिकाणी विराजित झाली आहे. १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत दररोज दुपारी २ ते ६ या वेळेत श्रीमद देवी भागवत कथा येथे होणार आहे. यासाठी परिसरातील भाविक भक्त आणि माहेश्वरी समाजबांधव उपस्थित आहेत. या महिलांची संख्या लक्षणीय आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता कलशधारी महिलांनी लालटाकी परिसरातून भव्य अशी मिरवणूक काढली. सजवलेल्या रथात देवी भागवत ग्रंथ ठेवण्यात आला होता. कथा स्थळी ग्रंथराज आणि युगुलशरणजी महाराज यांचे आगमन झाल्यानंतर फुलांची उधळण करून महिलांची पूजन केले. नंतर श्रीगोपाल धूत, मोहनलाल मानधना, श्रीगोपाल जाखोटिया, जगन्नाथ बजाज, धनेश लढ्ढा, जगदीश लढ्ढा, खाकीदास बाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक काबरा, सौ. गीता गिल्डा, सौ. सरला बजाज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. नंतरमाता पूजन आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर प्रवचनास सुरुवात झाली. स्वागत विनोद मालपाणी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. या कथेचे लाईव्ह प्रसारण श्री युगुलशरणजी महाराज या यु ट्यूब चॅनलवर संपूर्ण ८ दिवस होणार आहे. येथे माँ देवीच्या विशाल मूर्तीची स्थापना व्यासपीठावर करण्यात आली आहे. दररोज देवी मातेच्या प्रसंगानुरूप मानवी वेशभूषेतील झांकी येथे साकारण्यात येणार आहेत. या ठिकाणी कथा कथनात रविवारी श्री दुर्गा प्रकट उत्सव, सोमवारी श्री महाकाली रूप, मंगळवारी रेणुका माता प्रकटन, बुधवारी श्री महिषासुर मर्दिनी माता अवतरणार असून गुरुवारी श्री अर्थ नारी नटेश्वर माता कथा, शुक्रवारी श्री तुळजाभवानी माता आणि शनिवारी श्री शेरावाली माता दरबार कथा युगुलशरणजी महाराज सांगणार आहेत. याच दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता या ठिकाणी होणार्‍या नवचंडी योगाला पूर्णाहुती देण्यात येणार आहे. रविवारी सकाळी १० वाजता कथा समाप्ती आणि महाप्रसाद वाटप होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री वैष्णवी सुंदर कांड एवं भजनी मंडळाच्या अध्यक्ष सौ. सरला बजाज आणि जोत्स्ना मालपाणी यांनी केले आहे. श्रीमद देवी भागवत कथा यशस्वीतेसाठी सौ. शोभा लढ्ढा, कुंदा कांगला, शारदा गिल्डा, अर्चना लढ्ढा, मंगल बिहाणी संगीता लढ्ढा, लीला लढ्ढा, शारदा लढ्ढा, मंगल गट्टाणी, मंगला झंवर, किरण बिहाणी, भारती उपाध्ये, वीणा डापसे, सरस्वती झंवर, पार्वती दरक, विमल झंवर, उषा खंडेलवाल, प्रेमलता खटोड आदी प्रयत्नशील आहेत.