सारे काही माझेच ?
एक बहुश्रुत कीर्तनकार होते. निरनिराळी वचने, दाखले देऊन, गोष्टी सांगून कीर्तन खुलवायचे. लोकही रंगून जायचे, कीर्तनाला गर्दी करायचे. हरिदासबुवांची खूप स्तुती करायचे. एकदा या कीर्तनकाराला एक गावी त्यांचा जुना वर्गमित्र भेटला. त्यांनी त्याला आपल्या निवासस्थानी बोलाविले.आगत स्वागत केले व म्हणाले, “अरे, एकदा माझ्या कीर्तनाला ये ना, लोक माझी खूप स्तुती करतात. पहा तर एकदा ” मित्रानं मान्य केलं. रात्री तो कीर्तनाला गेला. कीर्तनकार रंगात आले. एकेक वचने सांगू लागले. नवा श्रोता मित्रत्वाच्या नात्याने पुढेच बसला होता. बुवांच्या एकेक वचनावर अभिप्राय देऊ लागला. “हे तर शंकराचार्यांनी म्हटलंय, हे रामदासांचे वचन, हे ज्ञानेश्वरीत सांगितलेय आणि हे तर एका इंग्रजी वचनाचं भाषांतर आहे.” बुवा चिडून म्हणाले, “अरे मूर्खाप्रमाणे सारखा अडथळा आणू नकोस.” लगेच मित्र उद्गारला, “हे मात्र तुमचे स्वतःच वाय आहे हं !” तात्पर्य : लेखक, वक्ते, राजकारणी अनेक वचने स्वत:चीच असल्यासारखी सांगत असतात. पण अहंकार बरा नव्हे