सगेसोयरेच्या अधिसूचनेवर जिल्ह्यातून ६० हजारांपेक्षा अधिक हरकती दाखल

0
49

हरकतपत्रे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मुंबई येथे जमा करणार : बाळासाहेब भुजबळ

नगर – कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयर्‍यांनाही ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याबाबत राज्य सरकारने २६ जानेवारी रोजी अधिसूचना काढली. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील म राठा समाजाच्या आंदोलनाला या निर्णयामुळे मोठे यश प्राप्त झाले. आता या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशनही बोलविण्यात आले आहे. मात्र सरकारच्या अधिसूचनेला ओबीसी प्रवर्गातून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होत आहेत. नगरमधून जवळपास ६० हजार पेक्षा अधिक हरकती दाखल करण्यात येणार आहेत. नगर शहरात सध्या हरकतींचे अर्ज संकलित करून गावनिहाय, तालुकानिहाय, वर्गीकरण करण्यात येत आहे. नगर तालुका, संगमनेर, अकोले, राहाता, शिर्डी, श्रीरामपुर, नेवासा, कोपरगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा या तालुयातील हरकतींचे पत्र येत आहेत. तसेच बिड, संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, अकोले नागपूर आदी जिल्ह्यातूनही अनेकांनी तसे पत्र दिले आहे. सर्व हरकती पत्रे एकत्र करून ती मुंबईला सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागात जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. याप्रसंगी सकल ओबीसी भटया विमुक्त समाजाच्या कार्यकर्ते निलेश चिपाडे, राजेंद्र पडोळे, रामदास फुले, मनोज भुजबळ, कॅप्टन सुधीर पुंड, अनिल इवळे, दिपक खेडकर, अनिल निकम, खराडे सर, संदीप भांबरकर, भरत गारुडकर, रोहित पठारे, सागर भुजबळ, ओंकार बेलेकर आदी उपस्थित होते.