विशिष्ट व्यायाम पद्धती आणि सतर्कतेने टाळता येतील आजार : डॉ.अमोल खांदवे

0
22

आर्किटेट आणि इंजिनीअर्ससाठी प्रकृती व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान


नगर – आर्किटेटस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो अहमदनगर आणि पोलाद स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्किटेट आणि इंजिनीअर्ससाठी प्रकृती व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. खांदवे यांनी सांगितले की, सध्याच्या धावपळीच्या युगात गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी अश्या विविध समस्या तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत दिसून येतात. आपले दैनंदिन कार्यालयीन काम, साइट तसेच घरातील काम चुकीच्या पद्धतीने केले जात असेल तर त्यामधून गुडघेदुखी, कंबर दुखी असे त्रास उद्भवण्याची शयता असते. बर्‍याच वेळी आपण शरीराची योग्य निगा राखत नाही व शरीराकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे वजन वाढणे, स्नायुंची असंतुलित ताकद, अपघातात होणारी दुखापत, वयानुसार हाडे ठिसूळ होणे, शरीराची लवचिकता कमी होणे, चूकीची व्यायाम पद्धती, खड्डेमय रस्त्यातून प्रवास हे विविध आजाराचे कारण आहे. यामुळे गुडघ्याला बाक, कंबरेला बाक बसतो. त्यामुळे हाडे एकमेकांवर जवळ येऊन त्यांच्यामध्ये घर्षण होणे तसेच वेदना होणे सूज येणे ही लक्षणे आढळून येतात. वेदनाशामक गोळ्या, मलम, तेल यामुळे तात्पुरता आराम मिळतो परंतु घरच्या घरी करता येतील असे सोपे व योग्य व्यायाम केल्यास हे आजार कायमस्वरूपी बरे होऊ शकतात. असे आजार होऊ नये यासाठी नियमित दम व श्वास वाढवणारे व्यायाम करणे, सूर्य नमस्कार, प्राणायाम करणे यांना प्राध्यान्य देणे आवश्यक आहे. त्याच बरोबर जीम, चालणे, धावणे व पोहणे हे तब्येतीसाठी फायदेशीर आहे.

चुकीच्या पद्धतीने केलेले व्यायाम आपल्या आरोग्यास आणि शरीरास हानिकारक असतात, त्यामुळे योग्य सल्ला घेऊन हे व्यायाम करावेत. कॉम्प्युटर वर काम करताना अथवा ऑफिसमध्ये काम करताना योग्य पद्धतीने बसणे, चुकीच्या शारीरिक हालचाली टाळणे, योग्य पद्धतीने उभे राहणे अथवा बसणे याची माहिती आपणास असणे आवश्यक आहे. आपल्याकडे निरोगी व्यक्तीचे करायचे व्यायाम व रुग्णांनी करायचे व्यायाम असे दोन आहेत.रुग्णांसाठी शारीकिदृष्ट्या त्यांच्या वेदनेला अनुसरून असणारे व्यायाम केले तरच फायदा होतो. कुठलाही व्यायाम करताना तो सुखकारक ताकदीने होणे गरजेचे आहे. रुग्णांच्या वेदना योग्य व्यायाम केल्यास दोन दिवसात कमी झाल्या पाहिजेत. तसे झाले नाही तर व्यायाम चुकत आहे असे समजावे. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत परंतु आपल्या वेदनेचा विचार करता कोणता व्यायाम योग्य आहे यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊन व्यायाम करणे गरजेचे आहे. यावेळी पोलाद स्टील कंपनीचे सुशांत गव्हाणे, यश दायमा तसेच एसा अध्यक्ष रमेश कार्ले, आदिनाथ दहिफळे, अन्वर शेख, जयप्रकाश विधाते, यश शहा, अजिंय बालटे आणि सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन मयुरेश देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव प्रदिप तांदळे यांनी केले.