शहर परिसरात चोऱ्या, घरफोड्या, लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ

0
23

नगर – नगर शहरासह उपनगरी भागात आणि शहराजवळील परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोर्‍या, घरफोड्या, लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चोरट्यांचा सर्वत्र मुक्त वावर असूनही पण पोलिसांना त्यांचा शोध लागत नसल्याने विविध पोलिस ठाण्यांतील डी.बी.पथकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. नगर शहरासह उपनगर भागात गेल्या काही दिवसांत चोर्‍या, घरफोड्या इतया प्रमाणात वाढल्या आहेत की, शहरात पोलिस यंत्रणेचा गुन्हेगारांवरील वचक संपला की काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे. दिवसाढवळ्या घरफोड्या होत असून, यामध्ये लाखो रुपयांचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज चोरटे लंपास करत आहेत. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि दुचाकी वाहनांच्या चोर्‍या तर प्रयत्न करूनही पोलिसांना थांबविता येत नसल्याचे दिसून येत आहे. बाजारात खरेदीसाठी गेलेल्यांचे पैसे चोरणे, दागिने चोरणे, प्रवासात बॅगा चोरणे, वाहने अडवून चोर्‍या असे प्रकार सुरू आहेत. पाळत ठेवून चोर्‍या करणार्‍या टोळ्याही कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये चोरी, घरफोडी, मोटारसायकल, मोबाईलच्या चोर्‍यांबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांपुढे आता चोरट्यांपासून बचाव करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

२ दिवसांत ५ घरफोड्या, ३ चोर्‍या अन् लूटमार

नगर शहर परिसरात गेल्या २ दिवसांत ५ घरफोड्या, ३ चोर्‍या आणि एक लुटमारीची घटना घडली आहे. यामध्ये लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ व तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ घरफोड्या झाल्या आहेत. एमआयडीसी हद्दीत निंबळक गावच्या शिवारात भास्कर केरू कोतकर यांच्या घरात रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत ८४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घरफोडीची दुसरी घटना नगर तालुयातील पांगरमल शिवारात आजिनाथ नवनाथ आव्हाड यांच्या घरी शनिवारी (दि.१०) सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत भरदिवसा घडली. त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घरफोडीची तीसरी घटना नागापूर एमआयडीसी परिसरात घडली. तेथे सद्दाम हुसेन लियाकत पठाण यांच्या मालकीच्या फॅब्रिकेशन वर्कच्या पत्र्याच्या शेडचा मागील बाजूचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी वेल्डिंग मशीनसह अन्य साहित्य चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.११) पहाटे घडली. याबाबत पठाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस कॉलनीत सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडले

देवदर्शनासाठी कुटुंबासह गेलेल्या सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व सफारीचे कापड असा ७१ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.११) सायंकाळी उघडकीस आली आहे. याबाबत सुरेश मुक्ताराम डहाके (रा. पोलिस कॉलनी, तवले नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी डहाके हे पोलिस दलातून निवृत्त झालेले असून ते नगर तसेच श्रीरामपूर येथे वास्तव्यास असतात. २ फेब्रुवारीला ते पत्नी आणि नातवासह जगन्नाथपुरी, गंगासागर येथे गेले होते. त्यांची सून ही पुणे येथे माहेरी गेलेली होती. शुक्रवारी (दि.९) सायंकाळी त्यांचा मुलगा घराला कुलूप लावून पुणे येथे सुनेला आणण्यासाठी गेला होता. डहाके हे रविवारी (दि.११) सायंकाळी ७ च्या सुमारास देवदर्शनाहून नगरमध्ये घरी परतले असता, त्यांना बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहिले असता कपाटाचे दरवाजे उघडे दिसले व सर्वत्र उचका पाचक केलेली दिसली. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मुलाला फोन करून ही माहिती दिली. तसेच पोलिसांना ही कळविले. रात्री त्यांचा मुलगा आल्यावर त्यांनी घरातून काय काय चोरीला गेले याचा शोध घेतला असता २० हजारांची रोकड, सोन्याचे दागिने व सफारीचे नवीन कापड असा ७१ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले. त्यांनी रात्री उशिरा याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची दुसरी घटना तपोवन रोडवरील हिंदुत्व चौक परिसरात घडली. या ठिकाणी अनिकेत शांताराम धामणे यांच्या घराचे बांधकाम सुरु असून त्या शेजारी त्यांनी बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी पत्र्याचे शेड केलेले आहे. अज्ञात चोरट्यांनी शेडच्या दरवाजाचे कुलूप तोडून शेडमध्ये ठेवलेले ड्रिल मशीन, कटर मशीन, पाण्याची मोटार असे बांधकामासाठी लागणारे साहित्य चोरून नेले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं. वि. कलम ४६१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवा निवृत्त पोलिसाचा मोबाईल गेला चोरीला

शहरातील मंगलगेट परिसरात मंगळवार बाजारात खरेदीसाठी गेलेल्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याबाबत जमादार महंमद सय्यद (रा. मुकुंदनगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसर्‍या एका घटनेत एका पोलिस कर्मचार्‍याची बजाज कंपनीची मोटारसायकल (क्र. एम एच १२, डी झेड २३१८) पोलिस मुख्यालयातील ए पी लॉन समोरून चोरीला गेली आहे. याबाबत गणेश रामदास धंगेकर (रा. पोलिस मुख्यालय) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चाकूचा धाक दाखवून दोघांना लुटले

चाकूचा धाक दाखवून रस्त्याने येणार्‍या – जाणार्‍यांच्या खिशातील पैसे बळजबरीने काढून घेतल्याचा प्रकार शनिवारी (दि.१०) सकाळी मार्केट यार्ड परिसरात घडला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजु ज्ञानदेव खैरे (वय ३२, रा. आशिर्वाद कॉलनी, सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे. गणेश म्हसोबा पोटे ऊर्फ टिंग्या (रा. कानडे मळा, मार्केट यार्ड, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या लुटारूचे नाव आहे. खैरे हे त्यांच्या दुचाकीवरून मुलीला शाळेत सोडण्यासाठी माळीवाडा येथे जात असताना मार्केट यार्ड समोर टिंग्या पोटे याने त्यांना हात करून थांबविले. तो खैरे यांच्या ओळखीचा असल्याने ते त्याच्या जवळ थांबले. त्याने खैरे यांना शिवीगाळ करून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. खैरे यांनी त्याला समजून सांगितले असता त्याने कमरेला खोसलेला चाकू काढून धाक दाखवून खिशातील २ हजार रूपये काढून घेतले. ‘यापुढे देखील तु मला महिन्याला ५०० रुपये द्यायचे नाहीतर तुला बघून घेईल’, अशी धमकी दिली. तसेच खैरे यांच्या ओळखीचे आसिफ ताजुद्द्दीन शेख (वय २९, रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) यांना देखील टिंग्या पोटे याने साडेआठच्या सुमारास राजधन हॉटेल, मार्केट यार्ड येथे अडविले. शेख हे कामावर जात असताना टिंग्याने त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्या खिशातील १ हजार ८०० रूपये काढून घेतले व ‘तु मला महिन्याला ५०० रुपये द्यायचे नाहीतर तुझ्याकडे बघतो’, अशी धमकी दिली. खैरे व शेख यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून सदरचा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी खैरे यांच्या फिर्यादीवरून टिंग्या पोटे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

’एलसीबी’ ला गुन्हेगार सापडतात मात्र स्थानिक पोलिसांना का नाही?

फक्त नगर शहर परिसरातच नव्हे तर जिल्हाभरात चोर्‍या, घरफोड्या, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. चोर्‍या घरफोड्या, दरोड्याच्या अनेक गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) करत चोरटे जेरबंद केलेले आहेत. जिल्हाभरात होणार्‍या वाहनांच्या चोर्‍यांची उकलही एलसीबी ने वेळोवेळी करत अनेक टोळ्या पकडल्या आहेत. जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या १७ खुनांपैकी १४ गुन्ह्यातील आरोपी एलसीबीने पकडलेले आहेत. जर हे गुन्हेगार एलसीबी ला सापडतात मग स्थानिक पोलिसांना का सापडत नाहीत. विविध पोलिस ठाण्यात नेमलेली गुन्हे शोध पथके (डी.बी.) नेमका कशाचा शोध घेतात? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या वाढत्या घटनांनी गुन्हे शोध पथकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून जिल्हा पोलिस अधिक्षकांनी याचा एकदा आढावा घेण्याची आवश्यकता आहे.