नगर – येथील सर्जे पुरा भागातील जमाल मोटर्स या दुकानातून अशोक लेलॅन्ड कंपनीचे अधिकृत ब्रॅन्ड असलेले लेपार्ट नावाचे एकुण ११ बनावट गिअर बॉस किट पकडले. याप्रकरणी प्रतिलीपी अधिकार अधिनियम कलमान्वये दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुब गौस मोहमंद कुरेशी (वय ६४, रा. सर्जेपुरा) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. रेवननाथ विष्णु केकाण (वय ३५, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. सर्जेपुरा भागातील जमाल मोटर्स या दुकानातून अशोक लेलॅन्ड कंपनीचे अधिकृत ब्रॅन्ड असलेले लेपार्ट नावाचे बनावट गिअर बॉस किट विक्री होत असल्याची माहिती केकाण यांना मिळाली होती. त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जमाल मोटर्स दुकानावर छापा टाकला. तेथे ११ बनावट गिअर बॉस किट मिळून आल्या आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.