बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड पळविली

0
75

नगर – सेवानिवृत्त वृद्धाचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले १ तोळा वजनाचे सोन्याचे दागिने आणि १० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील घोसपुरी गावात घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.८) सायंकाळी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोन्याबापू भाऊ इधाते (वय ७२, रा. घोसपुरी, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी इधाते हे सेवानिवृत्त असून त्यांची दोन्ही मुले सैन्यदलात कार्यरत आहेत. त्यामुळे घोसपुरी गावात वृद्ध पती पत्नीच राहतात. दि.३१ जानेवारी रोजी ते दोघे पती पत्नी त्यांच्या मुलाकडे तळेगाव (जि. पुणे) येथे गेले होते. तेव्हा पासून ४ फेब्रुवारी पयरतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले १ तोळा वजनाचे सोन्याचे दागिने, १० हजारांची रोकड चोरून नेली. इधाते हे बाहेरगावहून घरी परतल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी गुरुवारी (दि.८) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं. वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.