रावसाहेब शेळके पाटील यांच्यासाठी माघार घेत असल्याचे केले जाहीर
नगर – माजी खा.स्व. दादापाटील शेळके यांनी नगर तालुयात उभ्या केलेल्या महाआघाडीच्या विरोधात त्यांचे पुत्र रावसाहेब शेळके यांना उमेदवारी देत तालुयातील जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे कारस्थान रचले गेले. त्यामुळे स्व. दादा पाटलांच्या निधनानंतर होणार्या नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या या पहिल्याच निवडणुकीतून रावसाहेब शेळके यांच्यासाठी महाआघाडीचे सर्व उमेदवार माघार घेत असल्याचे महाआघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. महाआघाडीचे संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, संदेश कार्ले, प्रताप शेळके, प्रवीण कोकाटे, प्रवीण गोरे, अरुण म्हस्के यांच्यासह पदाधिकार्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी सहकार अतिशय प्रामाणिकपणे जगवला व त्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे संधी देऊन त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे कारभार करण्यास देऊन मोठे केले ते हयात असताना त्यांना तालुयात कुणी त्रास दिला त्यांच्या ताब्यातील संस्था कपटनीतीने कोणी काढून घेतल्या व त्यांचे राजकारण संपवण्याचे कटकारस्थान कोणी केले हे तालुयातील जनतेला ज्ञात आहे. त्याच प्रवृत्तीने महाआघाडी विरोधात रावसाहेब शेळके यांना पुढे करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे स्व.दादा पाटील शेळके यांचे सुपुत्र रावसाहेब पाटील शेळके यांच्याकरिता सर्वजण आमचे उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत. परंतु त्यांनी रावसाहेब पाटील शेळके यांना पुढील ५ वर्ष तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन करावे व त्यांनी आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील पाच वर्ष चांगला कारभार करावा. सध्या तोट्यात असलेल्या संघ पाच वर्षात नफ्यात आणावा. पाच वर्षात संघाची कुठलीही जागा विकू नये असा चांगला कारभार करण्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. स्व. माजी खासदार दादा पाटील शेळके यांना श्रद्धांजली म्हणून ही पहिली व शेवटची निवडणूक त्यांचे पुत्र रावसाहेब पाटील शेळके यांचे करता बिनविरोध करत आहोत परंतु या पुढील काळात आम्ही त्यांना गृहीत धरणार नाहीत असेही या पत्रकात म्हंटले आहे. मतदारांच्या पात्र-अपात्रतेच्या खेळीचा केला निषेध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा गैरवापर करत मतदारांच्या पात्र- अपात्रतेची मोठी खेळी खेळली गेली आहे. काही जुने सभासद अपात्र करून नवीन ५२१ सभासद हे केवळ बुर्हाणनगर, वारूळवाडी व कापूरवाडी या ३ गावांतील करण्यात आलेले आहेत. ज्यावेळी मतदार याद्या पात्र-अपात्र अशा प्रकाशित केल्या गेल्या त्यावेळी आमच्या ही बाब निदर्शनास आली होती. सभासदांचे शेअर्स पूर्ण करण्याचा व नवीन सभासद करण्याचा डाव अगदी गुपचूपपणे पद्धतशीरपणे केला गेला. हे शेअर्स पूर्ण करण्याकरता जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे ८ डिसेंबर रोजी पत्र देवून त्यासाठी एक महिना मुदतवाढ द्यावी अशी हरकत नोंदवली व त्यांनी या हरकतीस मी निर्णय घेऊ शकत नाही व यासाठी मुदत देणे हा निर्णय मी घेऊ शकत नसल्याचे आम्हाला आमच्या हरकतीस उत्तर दिले तेही अगदी उशिरा आम्हाला पोस्टाने मिळाले. या खेळीचा आम्ही महाविकास आघाडीच्यावतीने निषेध करत असल्याचेही या पत्रकात म्हंटले आहे