रात्रीच्या वेळी मारहाण करत तरुणाला लुटले

0
14

नगर – चौघांनी तरूणाला मारहाण करून त्याच्याकडील पाच हजाराची रोकड काढून घेतली. शनिवारी (दि.३) रात्री साडेदहाच्या सुमारास केडगाव उपनगरातील मिसाळ गल्लीत ही घटना घडली. मुकेश बबन खंदारे (वय ३७, रा. पाटील कॉलनी, नेप्ती रस्ता, केडगाव) असे लुटमार झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांनी काल, रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर धोत्रे, संदीप धोत्रे, काळ्या धोत्रे व लंब्या धोत्रे (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. वडार गल्ली, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी खंदारे हे सुरेश घेमुड (रा. केडगाव) यांच्याकडे मजुर म्हणून काम करतात. त्यांनी शनिवारी रात्री घेमुड यांच्याकडून कामाचे पाच हजार रूपये घेतले होते. ते पैसे घेऊन केडगावातील मिसाळ गल्लीतून जात असताना साडेदहाच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे सागर धोत्रे, संदीप धोत्रे, काळ्या धोत्रे व लंब्या धोत्रे यांनी त्यांना अडविले. बाजूला नेले व तुझ्याकडे किती पैसे आहे, असे म्हणून मारहाण केली. फिर्यादीच्या खिशातील पाच हजार रूपये काढून घेतले व अंधारा फायदा घेत तेथून पळून गेले. दरम्यान फिर्यादी यांनी कोतवाली पोलिसांना फोन केला असता पोलीस घटनास्थळी आले. फिर्यादीने घटनेची माहिती पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.