माजी नगरसेविका व लोकप्रतिनिधींच्या विरोधात तक्रारदार महिलेचे महानगरपालिकेत उपोषण सुरु

0
61

भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या सैनिकाच्या दारात अतिक्रमण करून खड्डा खोदणार्‍या माजी नगरसेविका आणि त्यांच्या तडीपार असलेल्या मुलावर कारवाई करावी यासाठी सीता पोपटराव कासार (रा. हनुमाननगर, दौंड रोड) यांनी ५ फेब्रुवारीपासून महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात सीता कासार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझी बहीण सौ. निर्मला अनिल येणारे हिचे पती सैन्यदलात आहेत. अतिक्रमण, सांडपाणी, बांधकाम यासंदर्भात मी त्यांच्यावतीने २०१९ पासून वेळोवेळी तक्रारी करूनही महापालिकेने आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. न्यायालयाच्या रे.मु.नं. ३१२/२० च्या निकालानंतर मनपाने अतिक्रमणावर कारवाई केलेली नाही. महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि त्यांचा तडीपार असलेला अट्टल गुन्हेगार मुलगा याने २४/१२/२०२० रोजी जेसीबीच्या सहाय्याने सैनिकाच्या दारात खोल खड्डा घेतलेला आहे. तेव्हापासून मी सर्व स्थानिक व मंत्रालयातील अधिकार्‍यांकडे सीडीसहित तक्रार केलेली आहे. परंतु अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. गुन्हेगारांवर झालेल्या कारवाया थांबाव्यात म्हणून शहरातील लोकप्रतिनिधी व त्यांच्या संबंधित राजकीय पदाधिकारी माझ्यासह कुटुंबास त्रास देत आहेत. त्यामुळे जोपर्यंत माजी नगरसेविका व त्यांच्या तडीपार मुलावर कारवाई होत नाही. तसेच न्यायालयाच्या निकालावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आयुक्तांच्या दालनासमोर आमरण उपोषण करत आहे. उपोषणादरम्यान माझा मृत्यू झाल्यास त्यास लोकप्रतिनिधी, त्यांच्या संबंधित राजकीय पदाधिकारी आणि त्यांचे नातेवाईक जबाबदार राहतील असे स्पष्ट करत राहुरीतील वकील दाम्पत्याच्या मर्डरप्रमाणेच आमचाही मर्डर झाल्यावर कारवाई करणार का? असा सवाल सीता कासार यांनी केला आहे.