अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे माथाडी कामगारांचे थकले सहा महिन्यांचे पगार

0
26

कामगार संघटनेच्या वतीने माथाडी मंडळात ‘निदर्शने’

नगर – कामगारांच्या पगाराचे व वाराईचे पैसे जमा असून देखील माथाडी मंडळातील अधिकार्‍यांच्या टोलवाटोलवीमुळे सहा महिन्यांपासून कामगारांचे पगार थकल्याच्या निषेधार्थ मार्केटयार्ड येथील माथाडी असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यालयात स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. हातावर पोट असलेल्या माथाडी कामगारांना जाणीवपूर्वक वेतनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करुन घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे, दत्ता तापकिरे, कुमार शित्रे, गौरव पाटोळे, गणेश टिमकरे, पिंटू सरोदे, सोपान कदम, लक्ष्मण गौरे आदींसह माथाडी कामगार सहभागी झाले होते. एमआयडीसी येथील कंपनीत माथाडी कामगारांचे पगार सहा महिने उलटून देखील माथाडी मंडळाच्या हलगर्जीपणामुळे अदा करण्यात आलेले नाही. कंपनीने पगारासाठी वेळोवेळी १० लाख रुपये माथाडी मंडळाकडे वर्ग केले आहे. तर वाराईची र क्कम देखील अदा करण्यात आलेली आहे. तरी देखील कामगारांचे पगार केले जात नाही.

कामगार माथाडी मंडळाचे नेमलेले इन्स्पेटर व इतर अधिकारी टोलवाटोलवीचे उत्तर देत आहे. माथाडी मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांना हा प्रकार माहीत असून देखील डोळे झाक सुरु असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. दिवाळी सणात देखील या माथाडी कामगारांचा पगार करण्यात आलेला नाही. कामगारांना मागील सहा महिन्यापासून पगार नसल्याने त्यांना दैनंदिन जीवन जगणे अवघड झाले आहे. मुलांचे शैक्षणिक खर्च, घराचे भाडे, दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला असून, कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये माथाडी मंडळाकडून कामगारांची पिळवणूक सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हातावर पोट असणार्‍या माथाडी कामगारांचे पगार लवकरात लवकर जमा करावे, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.