विमानात मैैल्याची विल्हेवाट कशी लावतात?

0
53

विमानात मैैल्याची विल्हेवाट कशी लावतात?

बसच्या प्रवासात केव्हातरी तुमची ‘तशी’ गडबड झालीच असेल निदान तुमच्या बरोबरच्या कोणाला तरी त्रास झालाच असेल. चालू बसमध्ये शौचास लागल्यास प्रचंड गोंधळ होऊ शकतो. कंडटरला विनवण्या करून एखाद्या स्टॉपवर गाडी जास्त वेळ थांबवावी लागते. तिथल्या तुटपुंज्या सोयींचा वापर करून धावतपळत गाडीत यावे तर प्रवाश्यांच्या त्रासिक नजरांना व प्रसंगी टोमण्यांनाही सामोरे जावे लागते. आपण अगदी शरमून जातो. याऊलट रेल्वेचा प्रवास याबाबतीत खूपच सोयीचा असतो; परंतु मैल्याच्या विल्हेवाटीची ही पद्धतही आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य नसते. विष्ठा सरळ रेल्वेच्या रूळामधील जागेत पडत असल्याने माती व पाणी यांंचे प्रदूषण होतेच. विमानामध्ये मैल्याच्या विल्हेवाटीची काय व्यवस्था असेल? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तेथे रेल्वेसारखा मार्ग तर वापरता येणार नाही. मग काय करत असतील? विमानात एक विशिष्ट अशी व्यवस्था असते तेथील संडासातून मैला एका टाकीत नेला जातो. या टाकीत फॉर्माल्डीहाईड, क्वाटर्नरी अमोनियम संयुग, रंगद्रव्य तसेच दुर्गंधीनाशक पदार्थ असतात. त्यामुळे मैला निर्जंतुक होतो व दुर्गंधीही येत नाही. विमान जमिनीवर आल्यानंतर या टाकीतील मैल्याची विल्हेवाट लावतात. विमानातील ही व्यवस्था आरोग्याच्या दृष्टीनेही चांगली असते. विष्ठेचा पाणी वा अन्नाशी संपर्क येऊ शकत नसल्याने रोगांचा प्रसार होत नाही.