नगर परिसरात दुचाक्या चोरणाऱ्या तिघांची टोळी पकडली

0
30

एलसीबीच्या पथकाने ६ लाख ३० हजारांच्या ७ दुचाया केल्या हस्तगत

नगर परिसरात दुचाया चोरणार्‍या तिघांची टोळी पकडल्यानंतर त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या दुचायांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.

नगर – नगर शहर व परिसरात दुचाकी वाहने चोरणार्‍या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून तिघांची टोळी पकडून त्यांच्याकडून चोरीतील ६ लाख ३० हजारांच्या ७ दुचाया हस्तगत करण्यात आल्या आहेत. राहुल विजय निकम (वय २४, रा. विळदघाट, मुळ रा. वडगांव गुप्ता, ता. नगर), बंडु सुदाम बर्डे (वय २९, रा. देहरे, ता. नगर) व अरुण बाळासाहेब धिरोडे (वय २५, रा.बेलापुर ता. श्रीरामपूर) अशी या आरोपींची नावे आहेत. नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांना मोटार सायकल चोरी करणारे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव, पो.हे.कॉ.मनोहर गोसावी, संदीप पवार, रविंद्र कर्डीले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे, पो.ना.भिमराज खर्से, फुरकान शेख, पो.कॉ.सागर ससाणे, रणजित जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड संभाजी कोतकर यांचे पथक नेमुन तपास सुरु केला. पथक नगर शहर परिसरात फिरुन मोटार सायकल चोरी करणारे आरोपींची माहिती घेत असताना पो.नि.आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे राहुल निकम हा साथीदारासह देहरे येथून विळदघाट बायपास येथे चोरी केलेली विना नंबर लाल रंगाची पॅशन प्लस मोटार सायकल विकण्यासाठी येणार आहे. ही माहिती मिळताच या पथकाने त्या ठिकाणी जावुन सापळा लावला, थोड्याच वेळात २ संशयित तेथे आले पथकाने त्यांना पकडले. त्यात राहुल निकम व बंडु बर्डे होते. त्यांच्या कडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी साथीदार अरुण धिरोडे याच्या समवेत संगमनेर, एमआयडीसी, निंबळक येथुन ४ व पुणे जिल्ह्यातील शिरुर व आळेफाटा येथुन ३ अशा एकुण ७ दुचाया चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी अरुण धिरोडे यालाही पकडले व त्या तिघांकडून हिरो होंडा पॅशन प्लस, बजाज पल्सर१५०, रॉयल इनफिल्ड लासिक, होंडा ऍ़टीव्हा, बजाज पल्सर २२०, हिरो होंडा सीडी १००, बजाज पल्सर १५० अशा ६ लाख ३० हजारांच्या ७ दुचाया हस्तगत केल्या आहेत.