अनुजा कौशल्य केंद्राने हजार महिलांना दिली स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा

0
50

नगर – प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या माध्यमातून सौ. ममता गड्डम आपल्या अनुजा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हजारो महिलांना फेशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देत असून याद्वारे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देत आहेत ही प्रशंसनीय बाब आहे, असे गौरवोद्गार नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी काढले. सावेडीतील पाईपलाईन रोड भिस्तबाग परिसरातील कसबे वस्ती, पंचरत्ननगर येथील अनुजा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचा ९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त अध्यक्षपदावरून सौ.बारस्कर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. वीणा बोज्जा, सुजाता उमालूटी, कमल पवार, सुभाष गड्डम आदी उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या की, नगरमध्ये फॅशन डिझायनींग क्षेत्रात अनुजा कौशल्य विकास केंद्राचे नाव मोठे आहे. त्यांनी हजारो महिलांना शिवणकला व कपड्यावरील नक्षीकामाचे प्रशिक्षण दिले आहे. या माध्यमातून महिला थोडया कालावधीत प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या घरातूनच कपडे शिवून देण्याचा व्यवसाय करू शकतात आणि या द्वारे त्या आपल्या पायावर उभ्या राहतात. ममता गड्डम यांनी आजतागायत हजारो महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यांना हे प्रशिक्षण मोफत मिळते आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडे अशा अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्याचा फायदा सर्वसामान्य घेऊ शकतात. त्या योजना सामान्य महिलांपर्यंत पोहोचविण्याचे काम गड्डम यांनी केले आहे हे कौतुकास्पद आहे. वर्धापन दिनानिमित्त प्रशिक्षण केंद्रात फुले आणि दिव्यांची सजावट करण्यात आली होती. या ठिकाणी केक कापण्यात आला.

प्रशिक्षण केंद्रात विशेष प्राविण्य मिळवणार्‍या प्रशिक्षणार्थी महिलांचा तसेच केंद्राला सहकार्य करणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. ममता गड्डम म्हणाल्या की, गेल्या १० वर्षात प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ४ ते ५ हजार महिलांना आपण मोफत प्रशिक्षण दिले. रेडिमेड नऊवारी शिवणे, एम्ब्रॉयडरी, फेशन डिझायनिंग, आरी वर्क असे प्रशिक्षण महिलांना दिलंय, त्यामुळे गोरगरीब महिलांना रोजगार मिळाला. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून ज्या महिलेकडे पैसे नाहीत. गोरगरीब आहे अशा महिलांना शिवणकाम मोफत शिकण्याची संधी मिळाली आणि मग पुढे त्या आपला व्यवसाय सुरु करू शकल्या. आपल्या कुटुंबाला त्यांनी हातभार लावला आणि आपली आर्थिक उन्नती त्या करू शकल्या. अवघ्या ५ महिन्यांच्या कोर्स मध्ये त्यांना पैसे कमवण्याची संधी प्राप्त होते. ज्या महिला असे प्रशिक्षण घेण्यात इच्छुक आहेत त्यांनी ९८९००६२४४१ या क्रमांकावर संपर्क साधावा. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंशू अंधारे, आणि रश्मी पालवे यांनी सहकार्य केले.