नगर अर्बन बँक पूर्ववत होण्यासाठी २८ जानेवारीला सहविचार बैठकीचे आयोजन

0
65

नगर – नगर शहरातील ११३ वर्षांची ऐतिहासिक, वैभवशाली परंपरा असलेली नगर अर्बन मल्टीस्टेट बँक सर्वसामान्यांना आधार देणारी, लहान मोठ्या उद्योजकांना पत देवून उभे करणारी होती. या बँकेत भ्रष्टाचार करून बँक बंद पाडण्याचे काम नियोजनपूर्वक करण्यात आले. नगरकरांसाठी अस्मितेसारखी असलेली ही बँक पुनर्स्थापित करण्यासाठी व बँकेची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी विचारमंथन व्हावे या उद्देशाने रविवार २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महाजन गल्ली गायत्री मंदिर सभागृहात सहविचार बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बँकेची सद्यस्थिती, कर्ज वसुली तसेच बँक पुन्हा सुरु होण्याच्या दृष्टीने काय करता येईल यावर विचार विनिमय करण्यात येणार आहे. सर्वांच्या सहकार्यातून फिनिस पक्षाप्रमाणे बँकेने पुन्हा भरारी घ्यावी याबाबत विचारांचे आदानप्रदान करण्यात येईल. तसेच भ्रष्टाचार करणार्‍यांवर कायदेशीर कारवाईला गती मिळण्यासाठी काय करता येईल याविषयीही चर्चा होणार आहे. बँकेत ठेवी अडकलेले खातेदार, ठेवीदार तसेच सभासद आणि बँकेवर कायम प्रेम करणारे नगरकर अशा सर्वांनीच या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा, डी.एम. कुलकर्णी, भैरवनाथ वाकळे, दिनकर देशमुख, सचिन जाधव यांनी केले आहे.