एसटी निवृत्त कर्मचाऱ्यांचे २९ जानेवारीला विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0
20

नगर – एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचार्‍यांना पेन्शन व इतर देयके दोन ते तीन वर्ष उलटून देखील मिळात नसल्याने राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागाच्या वतीने सोमवारी (दि.२९) सर्जेपूरा, रामवाडी येथील एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात सर्व जिल्ह्यातील एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे, जिल्हा सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार विठ्ठल देवकर यांनी केले आहे. सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचार्‍यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचा आर्थिक प्रश्न बिकट बनला आहे. जे कर्मचारी एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले. त्यांना पेन्शनचा लाभ सुरु झालेला नाही. तर ज्या कर्मचार्‍यांनी स्वच्छेने निवृत्ती घेतली अशांना अद्यापपर्यंत पैसे मिळालेले नाहीत. तसेच मेडिकल बिल, कामगार करार फरक इत्यादीसाठी सेवानिवृत्त कर्मचारी वंचित आहे. महामंडळाकडे वेळोवेळी मागणी करूनही आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण दिले जात आहे. मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना जीवन जगणे देखील अवघड झाले असल्याने संघटनेने आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.