नगर तालुक्यातील गावठी दारू भट्‌ट्यांवर पोलिसांची छापेमारी

0
25

नगर तालुयातील गावठी दारू भट्ट्यांवर छापेमारी करत कारवाई करण्यात आली.

नगर – नगर तालुयातील खडकी, खंडाळा या गावांच्या परिसरात असलेल्या चार गावठी दारू भट्ट्यांवर नगर तालुका पोलिसांनी छापेमारी करत १ लाख ३१ हजारांचे साहित्य व तयार दारू नष्ट केली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुका पोलिसांच्या पथकाने शनिवारी (दि.२७) सकाळीच ही कारवाई केली. खंडाळा गावचे शिवारात आरोपी युवराज बजरंग गिरे (वय ४६) याचे राहते घराच्या आडोशाला सुरु असलेल्या गावठी दारू भट्टीवर कारवाई करत ७० हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. खंडाळा गावचे शिवारात आरोपी पोपट गिरधारी गिरे (वय ७५) याच्या घराच्या आडोशाला असलेल्या हातभट्टीवर कारवाई करून ४२ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. खडकी गावचे शिवारात आरोपी अशोक विश्वनाथ पवार (वय ३५) याच्या घराच्या आडोशाला असलेल्या हातभट्टीवर कारवाई करून ५ हजारांचा तर एका महिलेच्या मालकीच्या हातभट्टी वर कारवाई करत १४ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. या चारही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई नगर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस अंमलदार राजू खेडकर, जयदत्त बांगर, विजय साठे आदींच्या पथकाने केली आहे.