विरोधात तक्रार केल्याने अंगावर गाडी घालत जीवे मारण्याचा प्रयत्न

0
79

 

सरपंचाने तहसीलदारांना खोटे शपथपत्र दिल्याने त्या विरोधात तक्रार केली म्हणून सरपंचासह त्याच्या साथीदाराने तक्रारदाराच्या अंगावर चारचाकी गाडी घालून तसेच शिवीगाळ व मारहाण करत त्याचे डोके गाडीच्या बोनेटवर आदळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुयातील चिचोंडी पाटील गावात घडली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलीप रामभाऊ कोकाटे (वय ४८, रा. ससेवस्ती, चिचोंडी पाटील, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, सन २०१५ साली आमचे गावातील सरपंच शरद खंडु पवार याने तहसीलदार यांना खोटे शपथपत्र दिले होते. त्याबाबत आपण तक्रारी अर्ज केला होता. त्या अर्जाची २० डिसेंबर २०२३ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. आपण केलेल्या तक्रार अर्जाबाबत सरपंच पवार याच्या मनात राग होता. मंगळवारी (दि.२३) दुपारी १२.३० चे सुमारास आपण कामानिमित्त मोटारसायकलवर नगरकडे जाण्यास निघालो असता १२.४० च्या सुमारास चिचोंडी पाटील गावात पाटील चिकन सेंटर समोरून नगर ते जामखेड रोडने जात असताना पाठीमागुन अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. धडक दिल्याने आपण गाडीसह खाली पडलो. त्यामुळे मला मुका मार लागला मी उठुन पाहिले असता मला धडक देणारी गाडी पुढे जावुन रोडच्या कडेला थांबली व त्यामधुन ड्रायव्हर साईडने आमचे गावातील सरपंच शरद खंडू पवार व दुसर्‍या बाजूने सुरज किशोर भोज हे उतरले. माझ्या जवळ येवुन मला शरद पवार हा म्हणाला की तु माझेविरूद्द तक्रारी अर्ज करतो काय. तुला गाडीची धडक देवुनही तु अजुन कसा काय जिवंत राहिला, मी तुला संपविल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणुन शिवीगाळ केली. त्यावेळी सुरज भोज याने मला शिवीगाळ करून माझे हात धरले व शरद पवार याने हाताने डाव्या डोळ्यावर, पाठीवर मारहाण केली व माझे डोके धरून त्याचे गाडीचे बोनेटवर आपटले. त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांपैकी बबन विठोबा बेल्हेकर यांनी आमचे भांडण सोडविले. त्यानंतर शरद पवार व सुरज भोज हे तेथुन निघुन गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी सरपंच शरद खंडू पवार व सुरज किशोर भोज या दोघांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३०७, ३२५, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.