नगर – अॅमेझॉन कंपनीच्या साहित्याचे वितरण करणार्या पूजा ट ्रान्सपोर्ट या कार्यालयाच्या गोडावूनचे शटर उचकटून त्यातील कपाटात ठेवलेली ६ लाख ४० हजारांची रोकड व २ एलईडी टीव्ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना नगर एमआयडीसी परिसरातील नागापूर येथील पितळे कॉलनीत घडली. याबाबत कंपनीचे प्रतिनिधी विशाल राजेंद्र परदेशी (रा. हडपसर, पुणे) यांनी मंगळवारी (दि.२३) सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागापूर येथील पितळे कॉलनीत पूजा ट ्रान्सपोर्ट कार्यालय व गोडावून आहे. या कार्यालयामार्फत अॅमेझॉन कंपनीच्या नागरिकांनी ऑनलाईन मागवलेले विविध प्रकारचे साहित्याचे वितरण केले जाते. कंपनीच्या प्रतिनिधींनी साहित्य वितरण करून त्याचे आलेले पैसे गोडावून मधील कपाटात ठेवलेले होते. अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि.२१) रात्री ९.३० ते सोमवारी (दि.२२) सकाळी ८.३० या कालावधीत गोडावूनच्या शटरचे कुलूप तोडून शटर उचकटून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेली ६ लाख ४० हजारांची रोकड व २ नवीन एलईडी टीव्ही चोरून नेले.
सोमवारी सकाळी कर्मचारी कार्यालयात आल्यावर त्यांना चोरीची घटना समजली. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक दिपक पाठक यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. चोरीची घटना कंपनीच्या पुणे येथील कार्यालयास कळविण्यात आल्यावर कंपनीचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी नगरमध्ये येवून मंगळवारी (दि.२३) सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.