जि.प. त तोडफोड करणाऱ्यावर खंडणीचेही दोन गुन्हे दाखल

0
82

नगर – जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या जन आधार सामाजिक संघटनेचा अध्यक्ष प्रकाश मोहन पोटे (रा. निंबोडी ता. नगर) याच्या विरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी २ स्वतंत्र गुन्हे शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. याबाबत २ शासकीय ठेकेदारांनी फिर्यादी दिल्या आहेत. मात्र या गुन्ह्यांचा तपास करून पोटे यास अटक करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. खंडणीची पहिली फिर्याद शासकीय कंत्राटदार मोहसीन पिरमहंमद शेख (वय ३२ रा. मुकुंदनगर) यांनी दिली आहे. त्यांनी नगर तालुयातील हातवळण व कोल्हेवाडी येथील जलजीवन मिशनचे काम घेतले होते. हातवळण येथील जलजीवन मिशन पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम मार्च २०२३ रोजी पूर्ण झालेले आहे.

दरम्यान ५ जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास शेख व लेबर ठेकेदार संजय शिवाजी लांडगे यांना जिल्हा परिषदेच्या गेटवर प्रकाश पोटे भेटला व त्यांना म्हणाला,‘तुम्ही हातवळण व कोल्हेवाडी येथील जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे, तुम्ही केलेल्या कामाचे माझ्याकडे व्हिडिओ शुटींग आहे, तुम्ही मला प्रत्येक कामासाठी २५ हजार रूपये द्या, नाहीतर मी तुम्ही केलेल्या जलजीवन मिशन कामाचे व्हिडिओ व्हायरल करीन, तुमची चौकशी लावील’, अशी धमकी देत खंडणीची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुसरी फिर्याद विलास आप्पासाहेब जगताप (रा. कुष्ठधाम रोड, नगर) यांनी दिली आहे. त्यांनी म्हंटले आहे की १८ जानेवारीला दुपारी प्रकाश पोटे हा जिल्हा परिषदेत भेटला व तुला जर ठेकेदारी करायची असेल तर १ लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर यापूर्वी जसे तुझे काम बंद पाडले तसे पुन्हा काम बंद पाडील असे म्हणत खंडणी मागितल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या दोन्ही फिर्यादीवरून पोलिसांनी प्रकाश पोटे विरोधात खंडणीचे २ स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून पुढील तपास स.पो. नि. विश्वास भान्सी हे करत आहेत.