हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाला तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

0
47

नगर – हॉस्पिटल मध्ये झालेल्या किरकोळ वादातून दोघांनी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ, दमदाटी केली. तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी (दि. १७) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास केडगाव उपनगरात घडली. रेवणनाथ बाबासाहेब कराळे (वय २५ हल्ली रा. केडगाव, मुळ रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर) असे व्यवस्थापकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम अंधारे व चैतन्य वाघ (दोघे रा. शास्त्रीनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी कराळे हे राजमाता हॉस्पिटल येथे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. ते बुधवारी दुपारी हॉस्पिटलमध्ये असताना त्यांचे शुभम आणि चैतन्य यांच्यासोबत वाद झाले होते.

याप्रकरणी रेवणनाथ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास रेवणनाथ केडगाव येथे राहत असलेल्या त्यांच्या दाजीच्या घरी असताना शुभम आणि चैतन्य तेथे आले. त्यांच्याकडे तलवार होती. त्यांनी रेवणनाथ यांना शिवीगाळ दमदाटी करून तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण केली व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रेवणनाथ कराळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम व चैतन्य यांच्या विरोधात शिवीगाळ, दमदाटी, आर्म अ‍ॅट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.